मुंबई : रणजी करंडकाच्या यंदाच्या मोसमातल्या साखळी फेरीची नुकतीच सांगता झाली. गेले दोन महिने रंगलेल्या साखळी सामन्यांच्या लढतीतून अव्वल आठ संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले आहेत. या आठ संघांमध्ये आता यंदाच्या रणजी मोसमाच्या विजेतेपदासाठीची चुरस रंगणार आहे.


रणजी करंडकाच्या महासंग्रामात 38 संघ सहभागी झाले होते. या 38 संघांची अ, ब, क आणि प्लेट अशा चार गटात विभागणी करण्यात आली होती. या चारही गटातून एकूण आठ संघ आता उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले आहेत.


बाद फेरीसाठी पात्र संघ-


अ गट - बंगाल, गुजरात, आंध्र प्रदेश


ब गट - कर्नाटक, सौराष्ट्र,


क गट - जम्मू काश्मीर, ओडिशा


प्लेट गट - गोवा


महाराष्ट्राच्या तीन संघांचं आव्हान संपुष्टात 


रणजी करंडकात महाराष्ट्रातून मुंबई, विदर्भ आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे संघ सहभागी होतात. पण यंदा तीनपैकी एकाही संघाला बाद फेरी गाठण्यात अपयश आलं. 41 वेळा रणजी करंडक जिंकलेला मुंबई, गतविजेते विदर्भ आणि महाराष्ट्र या तिन्ही संघांचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं.


मुंबईची निराशाजनक कामगिरी


सूर्यकुमार यादवच्या मुंबईला यंदा आपल्या लौकिकास साजेसा खेळ करता आला नाही. बडोद्याविरुद्धचा पहिलाच सामना मोठ्या फरकानं जिंकून मुंबईनं दणक्यात सुरुवात केली होती. पण यंदाच्या मोसमातला मुंबईनं मिळवलेला हा एकमेव विजय ठरला. घरच्या मैदानावर झालेल्या त्यानंतरच्या सलग दोन लढतीत मुंबईला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. मधल्या काही सामन्यांत प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या मुंबईची कामगरी आणखी खालावली. पण सरफराझ खाननं अखेरच्या काही लढतीत केलेल्या दमदार फलंदाजीमुळे मुंबईचा संघ ब गटातून क गटात येण्यापासून थोडक्यात वाचला.


मुंबईची साखळी फेरीतली कामगिरी


सामने - 8
विजय - 1
पराभव - 2
अनिर्णित - 5
गुण - 14
गतविजेत्या विदर्भाकडून निराशा


विजेतेपदाची हॅटट्रिक साजरी करणाऱ्या विदर्भाची सुरुवात चांगली झाली. पण मधल्या काही सामन्यांत झालेल्या चुकांमुळे विदर्भानं बाद फेरी गाठण्याची संधी गमावली.


विदर्भाची साखळी फेरीतली कामगिरी


सामने - 8
विजय - 2
पराभव - 2
अनिर्णित - 4
गुण - 21
महाराष्ट्राला उशीरा सापडली लय


महाराष्ट्राच्या संघानं क गटातल्या साखळी लढतींमध्ये अखेरचे पाचही सामने जिंकले. पण ही कामगिरी महाराष्ट्राला बाद फेरी गाठून देण्यास पुरेशी ठरली नाही. याचं कारण पहिल्या चारपैकी तीन सामन्यांत महाराष्ट्राला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.


महाराष्ट्राची साखळी फेरीतली कामगिरी


सामने - 8
विजय - 2
पराभव - 2
अनिर्णित - 4
गुण - 21


रणजी करंडक 2019-20 : उपांत्यपूर्व फेरीचे सामने


20 ते 24 फेब्रुवारी


पहिला सामना - गुजरात वि. गोवा


दुसरा सामना - कर्नाटक वि. बंगाल


तिसरा सामना - सौराष्ट्र वि. ओडिशा


चौथा सामना - आंध्र वि. जम्मू काश्मीर