नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध दर्शवत शिवडेतील ग्रामस्थांनी स्वत:चीच चिता रचून आंदोलन सुरु केलं आहे. तर दुसरीकडे झाडाला दोर बांधून गळफास घेण्याचा इशाराही दिला आहे. समृद्धी महामार्गाला नाशिकमधील शिवडेसह 49 गावांनी विरोध दर्शवला आहे.

नाशिकमधील शिवडे गावासह 49 गावातील ग्रामस्थांनी सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला आहे. चिता रचतच शिवडे गावात 45 ठिकाणी बांधांवर फासही लटकविण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाला जमिनी देण्यास सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यातील 49 गावातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करत लढा उभारला आहे. मुख्यमंत्र्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या इशाऱ्याने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासह संपूर्ण प्रशासन कामाला लागले आहे.

या महामार्गासाठी एक इंचही जमीन न देण्याचा निर्धार करत 49 गावांतील शेतकऱ्यांनी सरकारी दरपत्रकाची होळी केली, गावागावात बांधा-बांधांवर झाडांना दोरखंडाचे फास लटकविले, सरणही रचले आहे. बळाचा वापर करून जमिनी घेण्याचा प्रयत्न केलाच तर सामूहिक आत्महत्या करु, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

तसंच आम्ही आमच्यासोबत आमच्यावर दबाव टाकणाऱ्या अधिकाऱ्यांनाही घेऊन जाऊ, असंही आंदोलकांनी म्हटलंय. आज नाशिकच्या मुख्य बस स्टँडशेजारच्या ‘आयटक’च्या कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक झाली. यानंतर शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली.

दरम्यान, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी सरकारने काल दर जाहीर केले होते. यात जीरायती जमिनीला सरासरी हेक्टरी 50 लाख रुपये दर मिळणार आहे. किमान 40 लाख रुपये ते 85 लाख रुपये हेक्टरी भाव असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिली. हे दर एकरी असल्याचं अगोदर बोललं जात होतं, मात्र एकरी नव्हे तर हेक्टरी म्हणजे अडीच एकरसाठी 50 लाख रुपये भाव देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांचा विरोध कायम

दर जाहीर केल्यानंतरही शिवडे गावातील अनेक शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध मात्र कायम आहे. आम्हाला 2 कोटी रुपये एकरी दिले तरी आम्ही जमीन सोडणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सध्या सरकारकडून सुरु आहेत.

काय आहे प्रकरण?

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांचा विरोध डावलून मोजणी सुरु केल्याने रोष व्यक्त केला जात आहे. मुंबई-नागपूर हा समृद्धी महामार्ग राज्य सरकारचा महत्त्वाकांशी प्रकल्प आहे. या महामार्गासाठी सरकारने जमीन संपादन करण्यास सुरुवात केली. पण कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय हे संपादन होत असल्याचा दावा प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.

  • जमीन
    एकूण वन जमीन 399 हेक्टर
    एकूण शेत जमीन 17499 हेक्टर
    पडीक जमीन 2922 हेक्टर
    एकूण जमीन 20820 हेक्टर

  • खर्च 
    बांधकाम 24 हजार कोटी
    आर्थिक अधिभार 6 हजार कोटी
    भूसंपादन 13 हजार कोटी
    इतर 3 हजार कोटी
    एकूण खर्च 46 हजार कोटी


संबंधित बातम्या


हेक्टरी 50 लाख रुपयांचा भाव, समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाचे दर जाहीर


समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्यांना चॅप्टर नोटीस


VIDEO:   target="_blank">स्पेशल रिपोर्ट: मुंबई- नागपूर हायवेचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट   


समृद्धी महामार्ग मोजणीला हिंसक वळण