लातूर : पाऊस नसल्याने मराठवाड्यातील शेतकरी यावर्षीही चिंतेत आहेत. गेल्या दहा वर्षात कायमच दुष्काळाचा मार सहन करणाऱ्या लातूर जिल्ह्यात यंदा दीड महिन्यापासून पाऊस नाही. हवामानाचे अंदाज चुकले, पंचाग फेल झाले, आता आशा आहे ती लोकप्रथेवरच.. यामुळे कुठे बेडकांचं लग्न होत आहे, तर कुठे बाहुला-बाहुलीचे.. तर कुठे पर्जन्य यज्ञ.. सर्व काही पावसासाठी...

जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील लातूर शहरापासून 90 किमीवर असणारं होलसूर गाव... तीन दिवस झाले गावात एका लग्नाची तयारी सुरु आहे.. मंडप सजला... फटाके ... बँड ... गुगळ ... सर्वकाही नियोजन करण्यात आलं.. मग मांडवात आले नवरा-नवरी... भातुकलीच्या खेळातील बाहुला आणि बाहुली नवरदेव आणि नवरीच्या रूपात मांडवात अवतरले...

सर्वांना अक्षता वाटण्यात आल्या. मंगलाष्टक सुरु झाले... विधीवत लग्न सोहळा पार पडला.. जेवणावळी झडल्या. काही हजार रुपये खर्चण्यात आले. कारण काय, तर गेल्या एक महिन्यापासून या भागात पावसाने दडी मारली आहे ... पिके माना टाकू लागली आहेत. लोकमान्यता आहे, की बाहुला-बाहुलीचे लग्न लावल्यास पाऊस पडतो... यासाठी हा सारा प्रपंच करण्यात आला.

अशीच काहीशी अवस्था लातूरपासून 60 किमीवर असलेल्या बेलगावची आहे. इथे चक्क बेडकांचं लग्न लावण्यात आलं. वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी चक्क बेडकांचं वाजत-गाजत लग्न लावण्यात आलं. विशेष म्हणजे या लग्नाला अख्खं गाव मुलाबाळांसह उपस्थित होतं.

पाऊस पडत नसेल तर बेडकांचं लग्न लावण्याची एक अंधश्रद्धा ग्रामीण भागात आहे. याच प्रथेप्रमाणे गावात लग्नाच्या आयोजनासाठी निधी गोळा करण्यात आला. कोणी 50 रुपये, कोणी हजार, तर कोणी अन्न-धान्य दिले. बघता-बघता  बेडकाच्या लग्नाची तयारी चार-पाच दिवसात करण्यात आली आणि गाजत वाजत लग्न लावलं, लोकांना जेवू घातलं आणि लग्नानंतर बेडकांना सोडून देण्यात आलं.

लातूरपासून 15 किमीवर असलेल्या गंगापूर येथेही पावसासाठी पर्जन्य यज्ञ करण्यात आला. गंगापूर येथील शेतकऱ्यांनी वरूणराजाला खुश करण्यासाठी आणि पावसाला पुन्हा सुरुवात व्हावी म्हणून पर्जन्ययज्ञ केला. गंगापुरातील पावसाची सर्व परिस्थिती पाहता येथील काही गावप्रमुखांनी एकत्र येऊन पाऊस पडावा म्हणून पर्जन्य यज्ञ केला. यासाठी त्यांनी 10 टन वाळलेले जळण आणि दीड टन मिठाचा वापर केला. या यज्ञामुळे नैसर्गिक वातावरणात बदल होऊन पाऊस पडेल, अशी अपेक्षा या ग्रामस्थांनी व्यक्त केली.

पाऊस पडत नाही म्हणून लातूर जिल्ह्यातले शेतकरी हैराण आहेत. पिकांना जगवेल एवढा पाऊस असला तरी नदी-नाले तलाव कोरडे पडले आहेत. काही वर्षांपूर्वीची परस्थिती पुन्हा येण्याची सध्या स्थिती आहे. पाणी प्रश्न कायमचा निकाली निघावा यासाठी जलयुक्त शिवार योजना, नाम फाऊंडेशन किंवा गावपातळीवर प्रयत्न झाले, मात्र पिकांना जगवणारे पाणी यातून निर्माण होऊ शकत नाही. यासाठी वरूणराजाची कृपा आवश्यक आहे. ती होण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी आता लोकप्रथेचा मार्ग धरला आहे.