मुंबई : शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वर्षा या निवासस्थानी शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात २३ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मात्र आंदोलनाआधीच रविकांत तुपकर आणि त्यांच्या पत्नीस पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. वर्षा बंगल्याऐवजी आझाद मैदानावर आंदोलन करा, अशा सूचना पोलिसांनी दिल्याची माहिती मिळत आहे. 


शेतकरी प्रश्नावर आक्रमक झालेल्या रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला होता. राज्यातील सोयाबीन-कापूस उत्पादकांना दरवाढीसाठी त्यांनी वर्षा बंगला येथे आंदोलन करण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार आज ते वर्षा निवासस्थानी धडक देणार होते. मात्र वर्षा निवास्थानी आंदोलन करण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा बंदोबस्त


या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. अशातच आता तुपकर (Ravikant Tupkar) आंदोलन करण्यासाठी जाण्याआधीच त्यांना मरिन लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर रविकांत तुपकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, पोलीस मला कुठे नेतात ते बघू, त्यानंतर आंदोलनाची भूमिका ठरवू. पण सरकारला हे महागात पडेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. 


सुरक्षेच्या कारणास्तव घेतलं ताब्यात


विधानसभा निवडणुकीच्या आधी सोयाबीनला 9 आणि कापसाला 12 हजार रुपये दर द्यावा. तसंच शेतकरी कर्जमाफी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. यासह विविढ मागण्या तुपकर यांनी सरकारकडे केल्या आहेत. या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी आंदोलन पुकारले होते. मात्र आता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आज शेतकरी कशाप्रकारे आत्महत्या करतात याचे प्रात्यक्षिक आंदोलन तुपकर आणि काही शेतकरी करणार होते. सुरक्षेच्या कारणास्तव आणि परवानगी नसल्यामुळे चर्चगेट येथून तुपकर यांना पोलिसांनी हॉटेलमधून ताब्यात घेतले आहे.  सध्या त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आले आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


..तर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात प्रवेश करून शेतकरी आत्महत्येचं प्रात्यक्षिक करून दाखवू; रविकांत तुपकरांचा सरकारला थेट इशारा


शेट्टी म्हणाले आरोपांना भीक घालत नाही, तर तुपकर म्हणाले, डीपॉजिट जप्त झालेल्यांना गांभीर्यानं घेत नाही, राजू शेट्टी आणि तुपकर यांच्यात का बिनसलं?