लातूर : ऊस दर आंदोलन आता मराठवाड्यातही पेटण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातील मांजरा रेना आणि विकास या कारखान्यांनी 2200 रुपये भाव देणार असल्याचं जाहीर करताच शेतकरी संतप्त झाले आहेत . किमान 2700 रुपये दर द्यावा, अन्यथा आंदोलन करु, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
सध्या राज्यभर ऊसा दरासंदर्भात शेतकरी आणि साखर कारखानदार असा संघर्ष पेटलेलाय. हे लोण आता मराठवाड्यातही पाहायला मिळतंय.
पश्चिम महाराष्ट्रापेक्षा मराठवाड्यात ऊसाला कमी दर देण्यात येतो. यातच लातूर जिल्हातील सक्षम असलेले मांजरा, रेना आणि विकास कारखान्यांनी ऊसाला 2200 रुपये भाव देण्याचं जाहीर केलं. त्यामुळे शेतकरी संघटना आणि शेतकरी संतप्त झाले आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात सध्या ऊस दरासाठी जोरदार आंदोलन सुरु आहे. अहमदनगर जिल्ह्यात तर आंदोलनाला हिंसक वळण मिळालं होतं. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरीही सध्या ऊस दरासाठी आक्रमक झाले आहेत. काही जिल्ह्यांमधला हा प्रश्न मार्गी लावण्यात सरकारला यशही आलं आहे.