Shaktipeeth EXpressway: कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ विरोधात भाजपसह, राष्ट्रवादी अजित पवार गट, जनसुराज्य पक्षाचे नेते व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीमध्ये होवू न देण्याचा निर्धार गडहिंग्लजमध्ये राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वांनी एकमताने करण्यात आला. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह दिवसेंदिवस शक्तीपीठ विरोधातील लढा तीव्र होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानीसह काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, जनता दल यांच्यासोबत आता भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजित पवार गट आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवत शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. 


शिवाजी पाटलांनी पत्र देताच शेतकरी आक्रमक 


चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग घेऊन जाण्याची मागणी केल्यानंतर तीनही तालुक्यात शेतकरी तसेच संघटना व सर्वच पक्ष आक्रमक झाले आहेत. या महामार्गामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून सध्या गोव्याला जाण्यासाठी या तीन तालुक्यातून चार रस्ते जातात. यामुळे नवीन शक्तीपीठ महामार्गाची आवश्यकता नसल्याची स्थानिक नागरिकांनी भूमिका मांडली. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्तीने महामार्ग करण्यासाठी प्रयत्न करत असताना. कोल्हापूर जिल्ह्यातून भाजप , राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून येवू लागले आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ विरोधात विरोधकांची वज्रमूठ होवू लागली आहे.


मुख्यमंत्र्यांना खुश ठेवण्यासाठी पत्र दिलं


दरम्यान, चंदगडच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना खुश ठेवण्यासाठी मतदारसंघातून शक्तीपीठ घेऊन जावा असे पत्र दिल्याचं राजू शेट्टी म्हणाले. दरम्यान शेतकरी कधीही विकासाच्या आडवा येत नाही. मात्र, गरज नसलेला महामार्ग का लादला जातोय? असा पुनरुच्चार राजू शेट्टी यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. ते पुढे म्हणाले की पांडुरंग पंढरपूरच्या पांडुरंगाला साकडं घातलं आहे. तो नक्कीच शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी वातावरण निर्माण करेल असा आशावाद शेट्टी यांनी व्यक्त केला. 


इतर महत्वाच्या बातम्या