Raj Thackeray & Uddhav Thackeray: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मनसे आणि उबाठा गट हे दोन पक्ष एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मुंबई नुकत्याच पार पडलेल्या मेळाव्यात ठाकरे बंधू (Thackeray Brothers) एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे राज ठाकरेंसमोर युतीसाठी हात समोर केला होता. यानंतर राज ठाकरे यांनी कोणताही प्रतिसाद दिला नसला तरी ठाकरे गटाकडून मनसेशी (MNS) युती करण्यासाठी सर्वप्रकारची तयारी दाखवली जात आहे. कारण, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसेशी युती करण्यासाठी गेली काही वर्षे सोबत असलेल्या मविआ आघाडीशी (Mahavikas Aghadi) काडीमोड घेण्याचे संकेत दिले आहेत. मविआ आणि इंडिया आघाडी या अनुक्रमे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी तयार झाल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील समीकरणं वेगळी असतात, असे संजय राऊत यांनी म्हटले. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Continues below advertisement


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निर्णय स्थानिक पातळीवर घेतले जातात. आघाडी करायची की नाही, हा निर्णय त्यावेळी  घेतला जाईल. स्वबळावर तयारी सगळेच पक्ष करत असतात, आमचीही तयारी सुरु आहे. कोणी काहीही बोललं तरी हायकमांड यावर निर्णय घेईल, असे नाना पटोले यांनी म्हटले. 


Sanjay Raut: संजय राऊत नेमकं काय म्हणाले?


इंडिया आघाडी विषय हा राष्ट्रीय विषयांवर पार्लमेंटरी, लोकसभा, राज्यसभा या संदर्भात आहे. महाविकास आघाडी स्थापन झाली. त्याच्यामध्ये तीन पक्ष प्रामुख्याने होते. शिवसेना, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष. ही महाराष्ट्र विधानसभेसाठी निर्माण झालेली आघाडी आम्ही एकत्र निवडणुका लढलो. आम्ही महाविकास आघाडीतून कोणीही बाहेर पडलो नाही, आम्ही त्याचे घटक आहोत. आजही महाविकास आघाडी संदर्भात निर्णय एकत्र घेतले जातात, असे संजय राऊतांनी सांगितले.


आता विषय राहतो महानगरपालिकांचा, त्यासंदर्भात आजही लोकांच्या मनात प्रश्न आहेत. महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी या स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढतील काय? त्यासाठी त्यांची स्थापना नाही, स्थानिक स्वराज्य संस्था खास करून महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायत यासाठी वेगळी गणित आणि समीकरणे असतात. त्यासाठी कधीतरी स्वतंत्रपणे लढावं लागतं. कधी स्थानिक आघाडी करावी लागते. मला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मी इतकच सांगितलं आमच्या सगळ्यांवर जनतेचा दबाव आहे, जो आपण पाच तारखेला पाहिला असेल, मुंबई महानगरपालिका महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि मनसे खास करून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र निवडणुका लढाव्या, हा लोकांचा दबाव या संदर्भात भविष्यात चर्चा होतील, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.



आणखी वाचा


'उद्धव-राज ठाकरेंनी एकत्र निवडणुका लढाव्या यासाठी लोकांचा दबाव', इंडिया आघाडी अन् मविआवरती संजय राऊत स्पष्टच बोलले