कोल्हापूर: केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेनं आंदोलन पुकारलं होतं. त्यात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात येत असताना आंदोलक आणि पोलीसांच्यात वादावादी झाली.

Continues below advertisement


याप्रसंगी राजू शेट्टी म्हणाले की, "शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जातीय आणि प्रांतीय वळण लावण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण देश पेटवल्याशिवाय सोडणार नाही. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या भावना दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या सोबत आहेत."


ते पुढे म्हणाले की, "दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सीमेवरच रोखण्यात आलं, त्यांच्यावर पाण्याच्या फवाऱ्याचा आणि अश्रू गॅसचा वापर करण्यात आला. आता आंदोलक शेतकऱ्यांना खलिस्तानवादी म्हटलं जातंय. याचा सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं निषेध करतो. दिल्लीतील आंदोलन हे केवळ पंजाब वा हरियाणाचे आंदोलन नसून ते संपूर्ण भारताचे आंदोलन आहे."


येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढला नाही तर त्याचे परिणाम केंद्र सरकारला भोगावं लागतील असंही ते म्हणाले.


पोलीसांच्या दबावाला बळी न पडता येत्या काही दिवसात दिल्लीत ज्या प्रकारचं आंदोलन करण्यात येतंय त्या प्रकारचं आंदोलन महाराष्ट्रात उभं केलं जाणार असल्याचंही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं.


पहा व्हिडिओ: Farmer Protest Kolhapur | कोल्हापुरात ´स्वाभीमानी´च्या आंदोलनात वादावादी, पोलीस आणि आंदोलक आमनेसामने



महत्वाच्या बातम्या: