नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात मागील पाच दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर हजारोंच्या संख्येने शेतकरी जमले आहेत. शेतकरी मागे हटण्यास तयार नसल्याने आता त्यांचं आंदोलन आणखी चिघळू नये यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावलं आहे. आज (1 डिसेंबर) दुपारी तीन वाजता विज्ञान भवनात सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये बातचीत होणार आहे. खरंतर सरकारने चर्चेसाठी तीन डिसेंबरची तारीख ठरवली होती पण आंदोलनाचा नूर पाहता ती दोन दिवस आधीच होत आहे.


त्याआधी सिंघु बॉर्डरवर सकाळी 8 वाजता शेतकऱ्यांची या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. दरम्यान आंदोलन सुरु होण्याआधीही शेतकरी संघटनांसोबत 14 ऑक्टोबर आणि 13 नोव्हेंबर अशी दोन वेळा केंद्र सरकारची चर्चा झाली होती. पण ही बोलणी फिसकटली होती.

कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, चर्चेने मार्ग निघू शकतो. शेतकऱ्यांना दिल्लीच्या बुराडीमधील निरंकारी मैदानात आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती. पंरतु शेतकरी मागील पाच दिवसांपासून सिंघु आणि टिकरी सीमेवर ठाण मांडून बसले आहेत.





32 वर्षांपूर्वीही एका शेतकरी आंदोलनानं दिल्लीला भरवली होती धडकी


'निर्णायक' लढाईसाठी दिल्लीत आलोय : शेतकरी
आम्ही निर्णायक लढाईसाठी दिल्लीला आलो आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल असं शेतकऱ्यांनी काल (30 नोव्हेंबर) संध्याकाळी सांगितलं होतं.


आंदोलक शेतकऱ्यांच्या एका प्रतिनिधीने सिंघू सीमेवर मीडियाशी बोलताना सांगितलं की, पंतप्रधानांनी आमच्या 'मन की बात' ऐकावी अशी आमची इच्छा आहे. आम्ही आमच्या मागण्यांबाबत तडजोड करु शकत नाही." जर सत्ताधारी पक्षाने आमच्या मागण्यांवर विचार केला नाही तर त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल, असंही या प्रतिनिधीने सांगितलं.




दिल्ली वाहतूक पोलिसांकडून अलर्ट
शेतकऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली वाहतूक पोलिसांनी ट्रॅफिक अलर्ट जारीकेला आहे. "सिंघू सीमा दोन्ही बाजूंनी अजूनही बंद आहे. कृपया पर्यायी मार्गाचा वापर करा. जीटीके मार्ग आणि मुबरका चौकातून वाहतून वळवण्यात आली आहे. अतिशय जास्त कोंडी आहे. कृपया सिग्नेचर ब्रिजपासून रोहिणी आणि त्याव्यतिरिक्त जीटीके रोड, एनएच 44 आणि सिंघू सीमेपर्यंतच बाहेरचा रिंग रोड वापरु नका," अशी सूचना पोलिसांकडून देण्यात आली आहे.

तर दुसरीकडे दिल्ली पोलीस आयुक्त एसएन श्रीवास्तव म्हणाले की, "रस्त्यावर आंदोलन करम्यासाठी बुराडी मैदानात जा, तिथे योग्य व्यवस्था केली आहे, असा प्रस्ताव आंदोलक शेतकऱ्यांना दिला होता." "पोलिसांनी योग्य व्यवस्था केली असून आम्ही प्रत्येक परिस्थितीसाठी तयार आहोत," असंही त्यांनी सांगितलं.


Majha Vishesh | शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात केंद्र सरकारचे आढेवेढे का? कृषीमंत्री दिल्लीच्या वेशीवर का जात नाहीत?