मुंबई : सलग पाचव्या दिवशी कृषी बिलाच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एल्गार सुरुच आहे. या आंदोलक शेतकऱ्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. शेतकरी काय दहशतवादी आहेत का ? असा सवाल करत संजय राऊत यांनी बळाचा वापर चीनच्या सीमेवर करा असा सल्लाही केंद्र सरकारला केला आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, जो शेतकरी तुमचा अन्नदाता आहे त्याला तुम्ही दहशतवादी, देशद्रोही म्हणत आहात. पंजाब, हरियाणामधील शेतकरी महाराष्ट्राप्रमाणे आहे. हा देश सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी ज्यांनी प्रयत्न केला, जी प्रमुख राज्यं आहेत त्यामध्ये महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणाचा समावेश आहे. शेतकरी काय दहशतवादी आहेत का?, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांचा दिल्लीला वेढा, एन्ट्री पॉईंट्स बंद करण्याचा तसंच उद्यापासून देशव्यापी आंदोलनाचा इशारा
ते म्हणाले की, पंजाबच्या शेतकऱ्यांनी जगासमोर आदर्श ठेवत शांततेत आंदोलन या देशाच्या इतिहासात कधी झालं नव्हतं. ज्याप्रकारे शेतकऱ्यांवर बळाचा वापर केला जातो हा बळाचा वापर जर चीनच्या सीमेवर केला असता तर लडाखमध्ये चीनचं सैन्य घुसलं नसतं, असा टोलाही राऊत यांनी लगावला. सर्वांनीच शेतकऱ्यांना समर्थन दिलं पाहिजे. सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समर्थन केलं पाहिजे. शेतकऱ्यांशी तिथे जाऊन चर्चा केली पाहिजे. तुम्ही जेव्हा सत्तेत नव्हता आणि दिल्लीत येण्याचा मार्ग तयार करत होतात तेव्हा याच शेतकऱ्यांवर अत्याचार होणार नाही अशा घोषणा दिल्या होत्या. मग आज दिल्लीच्या सीमेवर आज काय सुरु आहे? शेतकरी दहशतवादी नाही. शेतकरी आहे म्हणून देश आहे, असं देखील राऊत म्हणाले.
उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेना प्रवेश करणार
संजय राऊत यांनी सांगितलं की, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ते म्हणाले की त्या शिवसैनिकच आहेत. ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्या प्रवेशामुळं आमची महिला आघाडी मजबूत होईल, असंही संजय राऊत म्हणाले.
सलग पाचव्या दिवशी शेतकऱ्यांचा एल्गार सुरुच
सलग पाचव्या दिवशी कृषी बिलाच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एल्गार सुरुच आहे. या आंदोलनाची धार वाढत चालली असून शेतकरी आंदोलक अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आंदोलकांनी आता दिल्लीत येणारे सर्व एन्ट्री प्वाईंट्स बंद करण्याचा इशारा दिला आहे. यामुळं दिल्लीमध्ये येणाऱ्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शेतकऱ्यांनी सोनीपत, बहादुरगड, मथुरा आणि गाजियाबादवरुन दिल्लीला जोडणारे पाचही एंट्री प्वाईंट्स बंद करण्याचा इशारा दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्याबाबत सरकारच्या वतीनं चर्चेचा प्रस्तावही ठेवला. पण तरीही शेतकरी मात्र आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. दिल्लीच्या वेशीवर धडकलेलं हे शेतकरी वादळ त्यामुळे आता कुठल्या वळणावर जाणार? हे महत्त्वाचे आहे.