Santosh Deshmukh murder case : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे (Massajog) सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण (Santosh Deshmukh murder case) सध्या राज्यभर चर्चेत आहे. विधानसभा अधिवेशनातही यावर वादळी चर्चा सुरु आहे. अशातच या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काऊंटर किंवा फाशीची शिक्षा मिळवून देणाऱ्यास एका शेतकऱ्यानं (Farmers) चक्क 51 लाख रुपये आणि 5 एकर बागायत जमीन बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वडशिंगे येथील शेतकरी कल्याण बाबर यांनी ही घोषणा केली आहे.
आरोपीच्या विरोधात सर्वसामान्य लोकांचा मोठा असंतोष
मस्साजोगचे येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्तेप्रकरणी राजकारणी आणि पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप लागत आहेत. अजूनही यातील मुख्य सूत्रधाराला अटक झाली नसल्यानं सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षातील आमदार आक्रमक झाले आहेत. आता या प्रकरणातील आरोपीच्या विरोधात सर्वसामान्य लोकांचा मोठा असंतोष समोर येत आहे. अशातच माढ्यातील शेतकरी कल्याण बाबर यांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधारास लवकरात लवकर अटक करणाऱ्यास 2 लाख रुपये रोख तर मुख्य आरोपीचा एन्काऊंटर करणाऱ्या अथवा फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यास 51 लाख रुपये तसेच 5 एकर बागायत जमीन देण्याची घोषणा केली आहे.
समाजात अशा हत्या होत राहिल्यास गुन्हेगारांना जरब कशी बसणार?
सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. त्यांना लहान लहान मुले आहेत. अशा पद्धतीने समाजात हत्या होत राहिल्यास गुन्हेगारांना जरब कशी बसणार? असा सवाल करीत बाबर यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीसाठी हे बक्षीस जाहीर केले आहे. कल्याण बाबर हे माढा तालुक्यातील वडशिंगे येथील शेतकरी आहेत. त्यांनी रोख 51 लाख आपली मालकीची 5 एकर बागायत जमीन देखील देण्याची घोषणा केली आहे. यावरुन संतोष देशमुख हत्याप्रकरणी समाजातही किती टोकाचा संताप आहे हे समोर आले आहे.
नेमकं काय घडलं?
संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोगकडे जात होते. यावेळी डोणगावजवळ दोन वाहनातून येऊन अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. अपहरणकर्त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांना त्यांच्या कारमधून बाहेर काढल्यानंतर काठीने बेदम मारहाण केली. नंतर अपहरणकर्त्यांनी त्यांना बळजबरीने ते आलेल्या गाडीत बसवून केजच्या दिशेने नेले. याबाबत केज पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरु केला होता. मात्र काही तासानंतर बोरगाव-दहीटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला.
महत्वाच्या बातम्या: