सांगली : गारपिटीने सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जतच्या पूर्व भागात हाहाःकार उडवला. गुरूवारी रात्री झालेल्या वादळी गारपिटीमुळे सुमारे 300 एकर क्षेत्रावरील बागायत शेती उद्ध्वस्त झाली. द्राक्षबाग,डाळींब आणि मक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर अनेक घरांचीही पडझड झाली. कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या इतर भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली.
जत हा दुष्काळी भाग म्हणून ओळखळा जातो. अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस आला आणि मोठी गारपीट झाली. जोरदार झालेल्या पावसामुळे रामपूर, बागेवाडी, कंठी, येळदरी, मल्हाळ यांसह परिसरातील सुमारे 300 एकर क्षेत्रावरील शेतीचं नुकसान झालं.
यामध्ये प्रामुख्याने द्राक्षबागा, डाळींब, मका आणि हळद पिकांचे मोठे नुकसान झाले. अनके ठिकाणी द्राक्षबागा या वादळी गारपिटीमुळे जमीनदोस्त झाल्या. तर या भागातील दोन तलाव हे भरून गेले आहेत. अनेक घरांचे पत्रेही उडून गेले.
पावसामुळे सहा ते सात कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. महसूल प्रशासनाकडून तात्काळ पंचानामे सुरू करण्यात आले आहेत. तर आधीच दुष्काळाने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना गारपिटीने पुरतं उद्ध्वस्त करून टाकलंय. त्यामुळे शेतकऱ्यांना आता तातडीने सरकारी मदतीची गरज आहे.
सांगलीतील जत तालुक्यात गारपिटीने मोठं नुकसान, घरांचीही पडझड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Oct 2018 10:30 AM (IST)
जून ते सप्टेंबर या काळात दडी मारलेल्या पावसाने अचानक येऊन शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात अचानक आलेल्या पावसाने आणि गारपिटीने पिकांचं आणि घरांचं नुकसान झालं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -