बीड : ऊसतोड कामगारांच्या संपाला अखेर यश मिळालं आहे. ऊसतोड कामगारांच्या मजुरीत पाच टक्के दरवाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे व आमदार जयंत पाटील यांच्या लवादाने हा निर्णय घेतला आहे..
आपल्या विविध मागण्यांसाठी ऊसतोड कामगार 19 ऑगस्टपासून संपावर होते. ऊसतोड कामगारांच्या मजुरी वाढीसंदर्भातील मागण्या 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण झाल्या नाही, तर पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही ऊसतोड कामगार संघटनेने दिला होता. त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या मजुरीत वाढ केल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
अशी असेल वाढ
सध्या अस्तित्वात असलेल्या सामंजस्य करारातील ऊसतोडणी दरामध्ये दिलेल्या 20 टक्के वाढीमध्ये 5 टक्के उत्तेजनार्थ वाढ करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे सध्या असलेल्या प्रतिटन 228 रुपये 19 पैसे मजुरीऐवजी आता मजुरांना प्रतिटन 239 रुपये 60 पैसे असा वाढीव दर मिळणार आहे.
गाडी सेंटर 254.62 रुपयांवरून 267.35 रुपये, टायर गाडी तोडणी 198.38 रुपयांवरुन 208.30 रुपये तर पहिल्या किमीसाठी 84 .72 रुपयांवरून 88.96 रुपये आणि पुढील प्रत्येक किमीसाठी 12.36 रुपयांवरून 12.98 रुपये अशी वाढ करण्यात आली आहे. सदरची वाढ सामजंस्य करारातील हंगाम 2018-19 आणि 2019-20 या हंगामाकरिता ग्राह्य राहणार आहे. यासंबधीचं पत्रक महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी सर्व साखर कारखान्यांना पाठवलं आहे.
संपूर्ण राज्यभरात 12 ते 13 लाख ऊसतोडणी मजूर आहेत. त्यात सर्वाधिक ऊसतोडणी मजुरांची संख्या बीड जिल्ह्यात आहेत. बीड खालोखाल नगर, उस्मानाबाद ,जालना, औरंगाबाद , जळगाव, धुळे, नंदुरबार भागात मजुरांची संख्या अधिक आहे. मुळात ज्या पद्धतीने ऊसतोड कामगारांना काम करावे लागते, त्या तुलनेत कष्टाचा मोबदला मिळत नाही.
ऊसतोड कामगारांच्या मागण्या काय होत्या?
- साल 2014-15 साठी अंतरिम दरवाढीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती त्याची अंमलबजाणी करावी.
- ऊस तोडणी दरात 100 टक्के वाढ करावी.
- 35 टक्के कमिशन मुकादमास द्यावे सध्या ते18.5 टक्के आहे.
- कारखाना साईटवर ऊसतोड मजूर व बैलांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध कराव्यात.
- 15 रुपये प्रत्येक दिवशी बैलगाडीच्या टायर गाडीचे भाडे घेण्यात यावे.
- 30 रुपये प्रत्येक दिवशी ट्रॅक्टर गाडीचे भाडे घ्यावे.
- ऊस तोडणी मजुरांचा जीवन विमा साखर कारखान्यांनी भरावा.
- 60 वर्षांच्या पुढील ऊसतोड मजूर मुकादमास पेन्शन मिळावी.
संपूर्ण राज्यभरात 12 ते 13 लाख ऊसतोडणी मजूर आहेत. त्यात सर्वाधिक ऊसतोडणी मजुरांची संख्या बीड जिल्ह्यात आहेत. बीड खालोखाल नगर, उस्मानाबाद ,जालना, औरंगाबाद , जळगाव, धुळे, नंदुरबार भागात मजुरांची संख्या अधिक आहे. मुळात ज्या पद्धतीने ऊसतोड कामगारांना काम करावे लागते, त्या तुलनेत कष्टाचा मोबदला मिळत नाही.