नागपूर : 6 टक्के कमिशन घेऊन नोटा बदलून देणं नागपुरातील एका व्यापाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. कारण या व्यापाऱ्याला तोतया आयकर अधिकाऱ्यांनी तब्बल 45 लाख रुपयांना लुटलं आहे. नागपूरच्या आसीमनगर भागात काल सायंकाळी ही घटना घडली.
नागपूरचे लोखंड व्यापारी अनुज अग्रवाल हे 6 टक्के कमिशन घेऊन जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा द्यायचा. अनुज अग्रवालला 45 लाख रुपयांच्या नव्या नोटा एका व्यक्तीला द्यायच्या होत्या. त्यानुसार अग्रवाल गुरुवारी संध्याकाळी 45 लाख रुपये घेऊन आसीमनगर भागातल्या एका घरात पोहोचला. यामध्ये दोन हजार, 100 रुपये आणि 50 रुपयांच्या नोटांचा समावेश होता.
मात्र त्याठिकाणी 3 ते 4 जणांनी आयकर विभागाचे अधिकारी असल्याचं सांगत छापा टाकला. त्यांनी अग्रवाल यांच्याकडील रक्कम जप्त करत उद्या आयकर विभागाच्या कार्यालयात रक्कमेविषयी खुलासा द्या, असा दमही भरला.
थोड्यावेळानंतर हा छापा तोतया अधिकाऱ्यांनी टाकल्याचं स्पष्ट झालं, त्यानंतर अनुज अग्रवालने पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस चोरट्यांचा शोध घेत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
दरम्यान, जी व्यक्ती अनुज अग्रवालकडून जुन्या नोटा बदलून घेणार होती, तिच चोरट्यांना सामील होती का, या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत.