Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्याच्या अनेक गावांमध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गॅबियन बंधाऱ्याच्या कामासाठी बनावट रोजगारांचे उपस्थिती पट दाखवून लाखो रूपयाचा भ्रष्टाचार केल्याचं समोर आले आहे. यामध्ये शेकडो कामगारांचे बनावट हजेरीपट तयार करण्यात आले आहेत. या कामगारांमध्ये अनेक कामगार परिवहन विभागाचे एसटी महामंडळाचे कर्मचारी वयोवृद्ध नागरिक दिव्यांग त्याचबरोबर मयत नागरिकांचा सुद्धा या कामगारांमध्ये समावेश आहे.
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या वतीने कोणतेही मागणी नसताना गॅबियन बंधाऱ्याचे काम करण्यासाठी बनावट उपस्थिती पट तयार केला. या मार्फत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथील सरपंच गंगाराम खील्लारे यांच्या निदर्शनास सर्वात आगोदर ही बाब आली. पाचशे मजूर दाखवून त्यांच्या नावाने बनावट उपस्थिती पट तयार करत लाखो रुपयांचा अपहार केल्याचे आढळून आले. त्यावरून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार देत कारवाईची मागणी केली आहे.
धक्कादायक म्हणजे असाच प्रकार औंढा नागनाथ तालुक्यातील अन्य दहा ते बारा गावांमध्ये उघड झाला आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे लक्षात येताच जिल्हा परिषदेच्या वतीने यावर चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.
एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना रोजगार हमीच्या कामांची देयके मिळण्यासाठी शासकीय कार्यालयात खेटे मारावे लागतात. परंतु कामाची कोणतीही मागणी नसताना आणि ग्रामपंचायतीचा कोणताही सहभाग नसताना अशा पद्धतीने कागदोपत्री या कामाची मंजुरी दिली जाते. कागदोपत्रीच काम सुरू करून बनावट हजेरीपट तयार करून तो निधी लाटण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. हिंगोलीमधील औंढा नागनाथ पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांनी हा प्रकार केल्याचे दिसून आले आहे. आपल्याकडे उपलब्ध माहिती अनुसार गोजेगावसह अन्य 10 ते 12 गावांमध्ये जवळपास 22 लाख 97 हजार रुपये निधीचा भ्रष्टाचार केल्याचं यामध्ये दिसून आला आहे.
चौकशी समिती गठित
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल राठोड यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. या चौकशी समितीच्या अहवालातून आणखी सत्य बाहेर येईल आणि दोषींवर कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.