Nitin Gadkari : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून बांधल्या जाणाऱ्या अमृत सरोवरामुळं पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त भागामध्ये जलसमृद्धी निर्माण होईल. यामुळं येथील शेतकरी कृषीसमृद्ध आणि अर्थसंपन्न होईल असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केलं. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, पीकेव्ही तसेच महाराष्ट्र पशू विज्ञान आणि मत्स्य विद्यापीठ परिसरात 20 अमृत सरोवरांचे लोकार्पण गडकरींच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
शेततळ्यातील गाळ रस्ते बांधकामासाठी वापरण्यात येणार
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे अकोला जिल्ह्यातील कृषी विद्यापीठ परिसरामध्ये 34 तलावांचे निर्माण होणार आहे. यातील 20 अमृत सरोवरांचे लोकार्पण गडकरींच्या हस्ते शनिवारी झाले. या शेततळ्यातील खोलीकरणातून आलेली माती तसेच गाळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्ते बांधकामासाठी वापरण्यात येणार आहे. या माध्यमातून तयार होणाऱ्या शेततळ्याला भर उन्हाळ्यात पाणी राहणार आहे. या उपक्रमामुळं या प्रक्षेत्राच्या दहा ते बारा गावाच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून, तेथील शेतकरी आता लिंबाची शेती देखील करत आहेत. या योजनांमुळे मोठमोठे तलाव-धरणे बांधण्याची गरज राहणार नाही. विदर्भ खऱ्या अर्थान सुजलाम् सुफलाम् होईल असे मत गडकरी यांनी व्यक्त केलं. यावेळी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे, डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, माफ्सूचे कुलगुरु डॉ. आशिष पातुरकर उपस्थित होते.
बुलढाणा पॅटर्न
रस्तेबांधणीसाठी शेततळी खोलीकरणातून निघालेला गाळ आणि माती रस्त्याच्या बांधकामात वापरुन शेतकऱ्यांना कुठलाही खर्च न उचलता शेततळी बांधण्याचा उपक्रम 2017 पासून महाराष्ट्र शासनाच्या एका आदेशान्वये सुरु करण्यात आला होता. त्याला बुलढाणा जिल्ह्यात भरघोस प्रतिसाद मिळाला असून त्या 'बुलढाणा पॅटर्नमुळे' बुलडाणा जिल्ह्यात 132 तलावाचे खोलीकरण झाले आहे. तिथे 22 हजार विहिरी पुनर्जीवित झाल्या तर 152 गावांना पाणी उपलब्ध झाल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. तसेच त्यांनी अकोल्यातील जलसंवर्धनाच्या कामाची पाहणीही केली. तसेच कृषी विद्यापीठात तयार करण्यात आलेल्या तलावाचे जलपूजनही याप्रसंगी करण्यात आले. केंद्र शासनाच्या 'अमृत सरोवर ' या धर्तीवर या तलावाची निर्मिती करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांनी अन्नदाता न राहता ऊर्जादाता व्हावं
पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून जलसोत्राचे संवर्धन करुन सुमारे 75 हजार तलाव अमृत सरोवर देशात निर्माण करण्याचे ध्येय आहे. याकामी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यरत असल्याचे गडकरींनी सांगितलं. शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता न राहता ऊर्जादाता देखील होणं काळाची गरज आहे. ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल निर्मिती या क्षेत्रात देखील त्यांनी उतरले पाहिजे असे आवाहन गडकरी यांनी केलं.
महत्वाच्या बातम्या: