Gajanan Kirtikar On Rohit Pawar : महाविकास आघाडीतील अंतर्गत कुरबुरी नेहमीच समोर येत असल्याचं चित्र आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि  काँग्रेस पक्षातील नेते आपल्या मित्रपक्षांवर टीका करताना दिसून येतात. असाच एक प्रकार अहमदनगर जिल्ह्यातून समोर आला आहे. शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर थेट शब्दात निशाणा साधत इशाराही दिला आहे.


गजानन कीर्तिकर यांनी म्हटलं आहे की,  राज्यात महाविकास आघाडी करण्यात आमदार रोहित पवार यांचे आजोबा शरद पवार यांचे मोलाचे योगदान आहे. पवार कुटूंबाला मोठी परंपरा असून त्याची जान राजकारण करतांना ठेवण्याची गरज आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर आमदार रोहित पवार यांनी दबाव टाकण्याचे धंदे बंद करावेत, असं  खासदार गजानन किर्तिकर यांनी म्हटले आहे. 


अहमदनगर जिल्हा शिवसंपर्क अभियानासाठी खासदार कीर्तिकर हे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. यानिमित्त ते कर्जत येथे बोलत होते. कीर्तिकर यांनी म्हटलं की, आमदार पवार यांनी आघाडीचा धर्म पाळत मतदारसंघांमध्ये शिवसैनिकांना आणि पदाधिकार्‍यांना विश्वासात घेऊन वाटचाल करावी. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये शिवसेनेला वाटा देण्यात यावा. त्याचप्रमाणे मतदारसंघामध्ये होणार्‍या विकास कामांमध्ये शिवसैनिकांना सहभागी करून घ्यावे. शिवसेना पदाधिकार्‍यांनी ज्या तक्रारी केल्यात, यावरून या ठिकाणी परिस्थिती गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी आघाडीचा धर्म पाळावा अन्यथा शिवसैनिक ही बांधिल राहणार नाहीत असा इशाराच शिवसेनेचे खासदार गजानन किर्तिकर यांनी दिला आहे. 


रोहित पवार यांनी कर्जतमध्ये माजी मंत्री राम शिंदे यांचा पराभव करत विधानसभा गाठली आहे. आपल्या मतदारसंघातील कामाबाबत ते नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देत असतात. आता कीर्तिकर यांच्या आरोपांवर रोहित पवार नेमकं काय उत्तर देतात याकडे लक्ष लागून आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Rohit Pawar : सामान्य लोकांच्या कामासाठी अधिकार्‍यांवर माझा दबाव नक्कीच, सुजय विखेंच्या टीकेला रोहित पवाराचं प्रत्युत्तर


 Rohit Pawar on Pravin Darekar : भाजपच्या उपटसुंभांचा 'छंद' आपल्याला दिसत नाही का? रोहित पवारांचा दरेकरांना सवाल