मुंबई : अवकाळी पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबतची माहिती देण्यासाठी तसेच सरकार त्याबाबत कोणती पावलं उचलत आहे, याबाबतची माहिती देण्यासाठी आज (01 नोव्हेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यभरात तब्बल 54 लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालं आहे.

मुख्यंत्र्यांनी सांगितले की, राज्यातील 325 तालुक्यांमध्ये तब्बल 54 लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालं आहे. हे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. सोयाबीन, डाळींब, ज्वारी, बाजरी या पिकांचं नुकसान झालं आहे. ज्वारी, बाजरी, सोयाबीनला पुन्हा कोंब फुटले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मी विमा कंपन्यांना बोलावून घेतलं होतं. नुकसान जास्त आणि कंपन्यांकडे लोक कमी असल्याने सरकारी पंचनामे ग्राह्य धरा, असे आदेश त्यांना दिले आहेत. तसेच उद्या उपसमितीची बैठक बोलावली आहे. उपसमितीला निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. उद्याच्या बैठकीत तत्काळ शेतकऱ्यांना काय मदत करता येईल, याबाबत विचार केला जाईल. ज्या शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे होऊ शकलेले नाहीत. त्यांनादेखील मदत मिळेल, याची काळजी घेतली जाईल.

मुख्यमंत्री म्हणाले की, सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना आदेश दिले आहेत की, आपआपल्या जिल्ह्यांमधील नुकसानग्रस्त भागांना भेटी द्या. संपूर्ण परिस्थितीचा आढावा घ्या. जेणेकरुन आपल्याला सर्व शेतकऱ्यांना लागेल ती मदत करता येईल. आमचं सरकार हा विषय गांभीर्याने हाताळत आहे.

अवकाळी पावसामुळे राज्यभरात झालेलं नुकसान
औरंगाबादला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. औरंगाबादमध्ये 22 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे.
नाशिकमधील 52 तालुक्यांमधील 16 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे.
अमरावतीत 12 लाख हेक्टर जमीन बाधित झाली आहे. 53 हजार हेक्टरवरील फळ पिकांचं नुकसान झालं आहे.
2 लाख हेक्टरवरील ज्वारीचं नुकसान झालं आहे.
5 लाख हेक्टरवरील मक्याचं पिक बाधित झालं आहे.
18 ते 19 लाख हेक्टरवरील सोयाबीनचं नुकसान झालं आहे.
कोकणातील 46 तालुक्यांमधील 97 हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे.