लडाख : केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवून जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली आहे. हे दोन्ही प्रदेश गुरुवारपासून (31 ऑक्टोबर) केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आले आहेत. लडाखच्या सुरक्षेची जबाबदारी आता महाराष्ट्राच्या खांद्यावर आहे. कारण अमरावतीच्या धामणगावचे सुपुत्र असलेले सतीश खंदारे यांची लडाखच्या पोलीस प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. खंदारे 1995 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.


सतीश खंदारे 1986 मध्ये धामणगाव तालुक्यातील अशोक विद्यालयातून इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर धामणगाव शहरातील सेफला हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातून ते बारावी उत्तीर्ण झाले. 1992 मध्ये पुण्यातली सीओयुपी अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीई झाले. 1995 मध्ये ते आयपीएस झाले. खंदारे यांनी बराच काळ जम्मू-काश्मीरमध्ये काम केले आहे. त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार सांभाळला आहे.