मुंबई : एकीकडे राज्यात काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा आहेत. परंतु काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि संजय निरुपम यांचा मात्र याला विरोध आहे. शिवसेना आणि काँग्रेसची विचारसरणी वेगळी आहे. त्यामुळे शिवसेनेला पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे. तसंच दिल्लीमध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही चर्चेची आपल्याला माहिती नाही, असंही शिंदे म्हणाले. तर काँग्रेस नेते शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचार कसा काय करु शकतात, असा सवाल संजय निरुपम यांनी विचारला आहे.

शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता स्थापनेवरुन रस्सीखेच सुरु असताना आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस ही संधी साधण्याची तयारी करत आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेस नेते सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला मदतीचा हात पुढे केला आहे. काँग्रेस नेत्यांचं शिष्टमंडळ आज दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेणार आहे. ज्यात सत्ता स्थापनेच्या संभाव्य हालचालींवर चर्चा होईल. आता दिल्ली हायकमांड काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.

जाती-धर्माचं राजकारण करणाऱ्या पक्षाला पाठिंबा देणार नाही : शिंदे
राज्यात कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे फ्रॅक्चर्ड मॅनडेट आहे. काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. कोणत्याही धर्म आणि जातीवर राजकारण करणाऱ्या पक्षाला आम्ही पाठिंबा देऊ शकत नाही. काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते दिल्लीला का गेले हे मला माहित नाही. आम्ही जनतेचा कौल मान्य करुन विरोधी पक्षात बसून जनतेची सेवा करायला तयार आहोत. सोनिया गांधींशी माझी चर्चा झालेली नाही, पण हे माझं वैयक्तिक मत आहे. मला पक्ष श्रेष्ठींनी विचारलं तर त्यांना मी कळवेन," असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

भाजप-शिवसेनेच्या भांडणाला बळी पडू नका : निरुपम
"भाजप शिवसेनेचा तात्पुरता वाद केवळ सत्तेसाठी आहे. नंतर ते पुन्हा एकत्र येणार. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या वादात काँग्रेसने पडू नये. सत्तेत आल्यानंतर ते परत एकत्र येतील आणि आम्हाला शिव्या घालतील. काँग्रेस नेते शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचार कसा करु शकतात?" असं ट्वीट संजय निरुपम यांनी केलं आहे.