मुंबई : वय झालं म्हणून व्यायाम करायचा नाही हे चूक आहे. आपण खाणं पिणं, चिडणं वगैरे बंद करतो का? नाही ना मग व्यायाम का बंद करायचा. मला जास्त जगायचं आहे हे प्रत्येकाने ठरवावं. आता थोड्या गोष्टी बदलल्या आहेत, त्यामुळं 120 वर्षांपर्यंत माणूस जगू शकतो असं शरीरसौष्ठवाचे भीष्माचार्य म्हणून ओळख असलेले मधुकर तळवलकर म्हणाले. आपण कधी जन्मलो हे आपल्याला माहिती आहे मग आपण कधी मरायचं हे आपण ठरवायचं, असंही तळवळकर म्हणाले. मरतानाही आनंदी मनाने अनंतात विलिन व्हायचं असं मधुकर तळवलकर यांनी म्हटलं. मधुकर तळवलकर यांच्याशी माझा कट्टा या कार्यक्रमात फिटनेस, व्यायाम, आहार यासह विविध विषयावर संवाद साधला.
समाधानी जगण्यासाठी तीन फॅक्टरीज
ते म्हणाले समाधानी जगण्यासाठी तीन फॅक्टरीज आपल्याकडे असाव्यात. पहिली डोकं शांत ठेवणारी आईस फॅक्टरी, दुसरी चांगलं बोलण्यासाठी जीभेवर शुगर फॅक्टरी आणि तिसरी म्हणजे मनात सॅटिसफॅक्टरी म्हणजे समाधान हे खूप गरजेचं आहे, असं ते म्हणाले.
हनिमूनचा काय आहे किस्सा
आपल्या व्यायामाच्या झिंगेविषयी सांगताना तळवलकर म्हणाले की, माझं लग्न झाल्यानंतर ते म्हणाले की, मी हनिमूनला जाताना 30-30 पौंडच्या दोन पिशव्या व्यायामाच्या साहित्याच्या घेतल्या होत्या. आम्ही हनिमूनसाठी महाबळेश्वरला निघालो होतो. त्यावेळी पुणे स्टेशनवर हमाल लोकांना या पिशव्या उचलल्या नाहीत. आम्ही लग्न सुद्धा व्यायामशाळेत केलं होतं, असंही त्यांनी सांगितलं. व्यायामशाळेत लग्न का केलं असं विचारलं असता ते म्हणाले व्यायामशाळा माझ्यासाठी मंदिर आहे. म्हणून मी माझ्या मंदिरात लग्न केलं. लग्नाचं रिसेप्शनसुद्धा व्यायामशाळेच्या मागील मैदानात केलेलं, असं ते म्हणाले.
कसा करावा व्यायाम
ते म्हणाले की, व्यायाम करण्यासाठी मनाची तयारी असणं गरजेचं आहे. आपलं पहिलं प्रेम स्वतावर असावं. जीवन हसत खेळत जगण्यासाठी व्यायामाची सवय असणं गरजेचं आहे. सौंदर्य जपता तसंच शरीर जपावं. ईश्वरानं आपल्याला हे जीवन एकदाच दिलं आहे. त्याला जपणं गरजेचं आहे. व्यायाम किती वेळ केला हे महत्वाचं नाही तो कसा केला हे महत्वाचं आहे. आपल्याला आवश्यक असलेला व्यायाम करावा. काही शारीरिक व्याधी असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करावा. व्यायाम स्वखुशीनं करावा, बळजबरीनं नाही, असं ते म्हणाले.
काय खावं- काय नाही
तळवलकर म्हणाले की, व्यायामात सातत्य असावं. मी खाण्याबाबत खूप प्रयोग केले. मी आधी दोनवेळा जेवायचो नंतर सहा वेळा जेवायचो नंतर चार वेळेचे प्रयोगही केले. मी सध्या चार वेळा जेवतो. प्रत्येक खाण्यात प्रोटीन आहे की नाही पाहावं. सहज मिळतं ते अन्न खावं. यासाठी अंडी खावी. नंतर कार्बो हायड्रेड आणि विटॅमिन मिनरल आणि फॅट हे प्रमाणात खावं. खाणं हे प्रमाणात असावं हे महत्वाचं आहे. सोमवार ते शनिवार लोकं पाळतात आणि रविवारी चीट डे करतात, माझ्या मते हे चुकीचं आहे, असं ते म्हणाले.