पंढरपूर : वारकरी संप्रदायातील अनेक परंपरेतील सर्वात वैशिष्ट्य पूर्ण परंपरा अशी ओळख आहे ती औसेकर फडाच्या चक्री भजनाची. गुंडामहाराज देगलूरकर यांनी रामपूरच्या जंगलातही ही परंपरा सुरु ठेवली. प्रत्यक्ष पांडुरंग या भजनात येऊन नाचतात अशी ही चक्री भजनाची 242 वर्षाची परंपरा यंदाही कोरोनाचे नियम पाळत पाळण्यात आली. दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणारे हे चक्री भजन यंदा मात्र केवळ 11 मानकऱ्यांनी साजरे केले असले तरी यातील तसूभरही उत्साह कमी नव्हता.


मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या फडातील गुरुबाबा औसेकर ही परंपरा चालवतात. डोक्याला मुंडासे अंगावर फुलांची शाल आणि दागिने, पायात चाळ असा पोशाखात डफाच्या थापेवर आणि टाळ मृदूंगाच्या तालात हे मंडळी देवासमोर चक्राकार पद्धतीने नाचत पारंपरिक 14 अभंग देवासाठी म्हणत असतात. हातात दिमडी आणि तोंडात गुरु महाराज गुरु चा जयघोष करीत सुरु झालेले भजन रंगात येवू लागताच वेगवेगळ्या पद्धतीने नाचत गात वारकरी बेधुंद पणे नाचू लागतात.



कोरोनाच्या सावटात माघी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न, माऊलीच्या गाभाऱ्याला आकर्षक सजावट


विठ्ठल मंदिरातील सभा मंडपात आज रंगलेल्या या सोहळ्यात सर्वसामान्य भाविकांना सहभागी होता आले नसले तरी मंदिरातील कर्मचाऱ्यांनी या भजनाचा आनंद लुटला. या परंपरेचे मानकरी असलेले औसा संस्थानाचे गुरुबाबा महाराज औसेकर यांना फुलांच्या विविध दागिन्यांनी सजविण्यात आले होते. पायात चाळ, गळ्यात वीणा , डोक्यावर फेटा अशा वेशातील गुरुबाबा दिमडीच्या तालावर नाचू लागताच साक्षात पांडुरंग नाचतोय असा भास पाहणाऱ्याला होत होता. चक्री भजनातील अतुच्य क्षण असलेली गिरकी घेताच देहाच्या विदेही अवस्थेत तल्लीन झालेले गुरुबाबाना जागे करण्यासाठी विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर केला गेला . अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असलेली ही चक्री भजनाची परंपरा माघ यात्रेच्या सांगता सोहळ्यात विठ्ठल मंदिरात झाली . यावेळी औसा संस्थानाचे ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांचेसह 11 मानकरी या चक्री भजनात सामील झाले .