पंढरपूर : राज्यभर कोरोनाचे संकट सुरु असताना आज माघ शुद्ध एकादशीचा सोहळा संचारबंदीत भल्या पहाटे सुरु झाला. आज माघ जया शुद्ध एकादशीला भल्या पहाटे विठुरायाची महापूजा मंदिर समिती सदस्या अॅड. माधवी निगडे यांच्या उपस्थितीत झाली. पंचामृत स्नान आणि मंत्रोच्चारात देवाची षोडशोपचारे पूजा करण्यात आली. रुक्मिणी मातेची पूजा मंदीर समितीचे सदस्य ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्या उपस्थित संपन्न झाली. यावेळी मंदीर समितीचे सदस्या शकुंतला नडगिरे, मंदीर समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. विठुराया आणि रुक्मिणी मातेची महापूजा पार पाडतामा कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करण्यात आलं. दोन्ही गाभाऱ्यात केवळ पाच जणांना प्रवेश देण्यात आला होता.
आज माघ शुद्ध जया एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला अतिशय वेगळी आणि आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून विठुराया गरुडावर उभा आहे. तर रुक्मिणी माता श्रीफळ रुपी कमळ पाकळ्यात उभी असल्याचं रूप फुल सजावटीमधून देण्यात आले आहे. पुण्यातील भाविक सचिन चव्हाण, संदीप पोकळे आणि युवराज सोनार यांनी ही संकल्पना फुल सजावटीतुन साकारली. विठ्ठल हा विष्णूचा अवतार आणि विष्णूचे वाहन गरुड असल्याने विठुराया गरुडावर उभा असल्याची अफलातून कल्पना फुल सजावटीतून साकारण्यात आली आहे. ही फुलांची सजावट करताना झेंडू, शेवंती, ग्लॅडीओ, ऑर्केड, ब्ल्यू डीजे, संगोप आणि ड्रेसिना या फुलांच्या रंगसंगतीचा वापर केला आहे. आजवर विठ्ठल मंदिराला अनेक प्रकारच्या फुलांची सजावट करण्यात आली असली तरी आजची सजावट वेगळी आणि खास आहे. कोरोना आणि संचारबंदीमुळे भाविकांना ही सजावट मंदिरात येऊन पाहता येत नसली तरी टीव्हीच्या माध्यमातून त्यांना याचा आनंद घेता येणार आहे.
दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे यंदा माघी यात्रा प्रशासनाने रद्द करताना एकाही भाविकाला पंढरपूर शहरात येऊ न देण्यासाठी त्रिस्तरीय नाकेबंदी सुरु केली आहे. माघी वारीसाठी आलेल्या भाविकांची वाहने परत पाठवण्यास सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्हा सीमेवर पहिली नाकेबंदी करण्यात आली असून दुसरी नाकेबंदी पंढरपूर तालुक्याच्या सीमेवर लावण्यात आली आहे. या दोन्ही नाकेबंदी चुकवून आलेली वाहने पंढरपूर शहराच्या सीमेवर अडवून त्यांची तपासणी केली जात आहे व भाविकांची वाहने पुन्हा परत पाठवण्यास सुरुवात केली आहे. जी वाहने केवळ कळस दर्शन घेऊन लगेच परत जाणार आहेत, अशा भाविकांचे मोबाईल नंबरच्या नोंदी पोलीस ठेवत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Pandharpur Maghi Yatra Festival : माघी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न