पुणे : 31 डिसेंबर रोजी पुण्यातील शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेमुळे कोरेगाव भीमा इथे जमलेल्या गटांमध्ये तेढ निर्माण झाला, असा दावा पुणे शहर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या दोन सदस्यीय चौकशी समितीसमोर केला आहे. पोलिसांनी शुक्रवारी (3 नोव्हेंबर)  प्रतिज्ञापत्र सादर केलं. यात हा उल्लेख करण्यात आला आहे.


मात्र एल्गार परिषदेमुळे कोरेगाव भीमा इथे हिंसाचार घडला, असं थेट पोलिसांनी म्हटलं नाही. पोलिसांचं हे प्रतिज्ञापत्र आतापर्यंतच्या भूमिकेमध्ये काहीसा बदल दर्शवणारं आहे. कारण एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हिंसाचार यांचा काहीही संबंध नाही, असं पुणे पोलिस सुरुवातीपासून सांगत होते. पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात समस्त हिंदू जनजागृती समितीचा प्रमुख मिलिंद एकबोटेमुळे हिंसाचार झाल्याचं म्हटलं आहे.

मात्र त्यानंतर चौकशी आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पुणे ग्रामीण पोलिसांनी मिलिंद एकबोटेचं नावही घेतलेलं नाही. त्यामुळे कोरेगाव भीमा हिंसाचाराला जबाबदार कोण, याबाबत पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या भूमिकांमध्ये बदल झाल्याचं दिसतं आहे.