पंढरपूर : साखर कारखान्यावर ऊस वाहणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये गाण्यांचा आवाज वाढवल्यामुळे पोलिसांनी केलेल्या मारहाणी ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला आहे.  माढा येथील ही घटना आहे. मृतांच्या नातेवाईकांनी माढा पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन करत, दोषी पोलिसांचं निलंबन होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.


प्रदीप कल्याण कुटे असं 24 वर्षीय मृत ट्रॅक्टर चालकाचं नाव आहे. प्रदीप उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील सोनगिरी येथील रहिवासी आहे.


साखर कारखान्याला ऊस वाहतूक करतेवेळी गाण्याचा आवाज जास्त असल्याने मानेगाव चौकीतील पोलिसांशी प्रदीपची वादावादी झाली. यावेळी पोलिसांनी केलेल्या मारहाणीत प्रदीपचा मृत्यू झाल्याचं प्रदीपच्या नातेवाईक व गावकऱ्यांचं म्हणणं आहे.


पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र प्रदीपच्या आई आणि पत्नीने प्रदीपचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.


घटनेनंतर मृताचे नातेवाईक व ग्रामस्थांनी माढा पोलीस स्टेशनसमोर मोठी गर्दी केली. पोलिसांचे निलंबन झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास प्रदीपच्या नातेवाईक आणि गावकऱ्यांनी नकार दिला.