सोलापूर : पंढरपुरातील ट्रॅक्टर चालक प्रदीपच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबीयांच्या संतापासमोर पोलिसांना झुकावं लागलं आहे. दोन पोलिसांवर कलम 302 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साखर कारखान्यावर ऊस वाहणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये गाण्यांचा आवाज वाढवल्यामुळे पोलिसांनी केलेल्या मारहाणी 24 वर्षीय ट्रॅक्टर चालक प्रदीप कुटे यांचा मृत्यू झाला होता. माढा येथील ही घटना आहे.


साखर कारखान्याला ऊस वाहतूक करताना गाण्याचा आवाज जास्त असल्याने मानेगाव चौकीतील पोलिसांशी प्रदीपची वादावादी झाली. यावेळी पोलिसांनी केलेल्या मारहाणीत प्रदीपचा मृत्यू झाल्याचं प्रदीपच्या नातेवाईक आणि गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

प्रदीप कुटे यांच्या मृत्यूची नोंद अकस्मात मयत म्हणून केल्याने त्याचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी माढा पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली होती. पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत जमावाने रात्री नऊच्या सुमारास मृतदेह माढा पोलीस ठाण्यात आणून ठेवला. यामुळे वातावरण आणखीच चिघळलं.

अखेर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील इतर अधिकारी माढ्यात रात्री उशिरा दाखल झाले. यानंतर माढा दिवाणी न्यायाधीशांच्या समक्ष इनक्विस्ट पंचनामा करुन, जबाबदार हवालदार दशरथ कुंभार आणि दीपक क्षीरसागर या दोघांवर आज पहाटे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरकडे पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा तपस राज्य गुप्तचर विभागाकडे देण्यात आला आहे. या घटनेत मृत झालेले प्रदीप कुटे हे चालक उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील सोनगिरी इथले रहिवासी आहेत.