पुणे : एल्गार प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने एल्गार प्रकरणी 11 जणांविरोधात नव्याने गुन्हे दाखल केले. यामध्ये आरोपींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा अद्यापतरी दाखल करण्यात आलेला नाही. एनआयएच्या एफआयआर कॉपीमधून ही बाब उघडकीस आली आहे. या सर्वांविरोधात आधी देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.


एल्गार परिषदेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात यावा, यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने पुणे सत्र न्यायालयात केलेल्या अर्जावर आता 6 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मागणीवर आपलं म्हणणं मांडण्यासाठी वेळ मिळावा अशी मागणी आज आरोपींचे वकील आणि सरकारी वकिलांनी केल्यानंतर पुणे सत्र न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणी जो नव्याने गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये आता अटकेत असलेल्या नऊ आरोपींची आणि सध्या जामिनावर असलेल्या गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांची नावं आहेत.

सर्व 11 आरोपी आणि इतरांनी मिळून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण केला, असं राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हटलं आहे. परंतु राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाखल केलेल्या या गुन्ह्यामध्ये कबीर कला मंचच्या काही सदस्यांची नावं नाहीत. पुणे पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी एल्गार प्रकरणाची सुरुवातच मुळ कबीर कला मंचच्या सदस्यांवर गुन्हा दाखल करून केली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाखल केलेल्या गुन्ह्यात कबीर कला मंचच्या सुधीर ढवळेचं नाव आहे. मात्र सागर गोरखे, रमेश गायचोर, हर्षाली पोतदार, दीपक डेंगळे आणि ज्योती जगताप यांची नावं नाहीत.

याशिवाय राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाखल केलेल्या गुन्ह्यात देशद्रोहाचे कलम अद्यापतरी लावण्यात आलेलं नाही. राष्ट्रीय तपास यंत्रणेने न्यायालयात सादर केलेल्या त्यांच्या अर्जासोबत पुणे पोलिसांनी या प्रकरणात दोन वर्षांपूर्वी एल्गार प्रकरणात दाखल केलेल्या एफआयआरची प्रत देखील जोडली आहे.

संबंधित बातम्या