नागपूर : निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. देशातील पाच राज्यातील निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असतानाच पटोले यांनी आरोप केला आहे. राज्यात जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका होत असताना ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने निवडणुका पुढे ढकलण्याचे राज्य निवडणूक आयोगाला सांगितले होते. मात्र, तरीही राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका लावल्या. त्यामुळे निवडणूक आयोग कोणाच्या इशाऱ्याने काम करते हे स्पष्ट असल्याचे पटोले म्हणाले. 


राज्यातील काही काँग्रेस आमदारांनी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यात काहीही गैर नाही. राज्यात काँग्रेस पक्ष एकजुटीने काम करत असून, कोणत्याही आमदाराच्या नाराजीची कोणतीही माहिती माझ्याकडे नाही असा दावा देखील नाना पटोले यांनी केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयांची रेकी जरी दहशतवादी करत असले तरी असे हल्ले थांबवण्यासाठी सरकार सक्षम असल्याचे नाना पटोले म्हणाले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षिततेचा विषय गंभीर असून, काँग्रेस पक्ष त्याकडे गांभीर्याने पाहत आहे. देशाने आधीच दोन पंतप्रधान अशाच हल्ल्यात गमावले आहेत. मात्र, जेव्हा पंतप्रधानांची गाडी थांबली, तेव्हा भाजपचे लोकच झेंडे घेऊन तिथे का होते? त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला नाही का? असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला. चंद्रकांत पाटील कोणावरही ईडी लावू शकतात. त्यांचे केंद्रात सरकार असल्याने ते काहीही करू शकतात. पाच राज्यातील निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष तयार असून देशातील जनता भाजपच्या नौटंकीला ओळखून आहे. त्यामुळे आता परिवर्तनाची लाट येणार असल्याचा दावाही पटोले यांनी केला आहे. महिलांच्या बाबतीत चुकीचे शब्द उच्चारणे, महिलांचा अपमान कोणीही करू नये असेही पटोले यांनी यावेळी सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या: