सांगली : सांगलीच्या वाळवा तालुक्यातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी व शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी एक विशेष अभियान राबविण्यात येतेय. जयंत दारिद्रय निर्मुलन अभियान असे या अभियानाचे नाव असून  यात मोलाचे सहकार्य मिळतेय अमेझॉन इंडियाचे. अमेझॉन इंडियाच्या सहकार्याने आणि जयंत दारिद्रय निर्मुलन अभियानांतर्गत हा टॅब वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. जवळपास 250 विद्यार्थ्यांना या अभियानाच्या माध्यमातून टॅब वाटप करण्यात आले. त्यामुळे टॅब हाती आले हो; शिकणं सोपे झाले हो! अशी भावना या 250 विद्यार्थ्यांच्या मनामध्ये झालीय. घरच्या परिस्थितीमुळे त्याना या कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहावे लागले. शिक्षणाच्या प्रवाहातून ही मुले बाहेर पडू नयेत म्हणून प्रतिक जयंत पाटील यानी पुढाकार घेत जयंत दारिद्रय निर्मुलन अभियानाच्या माध्यमातून 250 विद्यार्थ्यांना टॅब दिलेत.


कोरोना-19 या जागतिक महामारीच्या काळामध्ये असामान्य अशी परिस्थिती निर्माण झाली. मानवी जीवनाच्या सर्वच बाजूवर या संकटाने प्रभाव टाकला. याचा शैक्षणिक प्रक्रियेवरही परिणाम झाला. कोरोना विषाणूच्या भीतीने शाळा बंद करण्यात आल्या आणि विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात झाली. यामध्ये गरिब कुटुंबातील विद्यार्थ्यांना  केवळ ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल, टॅब, संगणक आणि इंटरनेट सुविधा या मुलभूत गोष्टीं नसल्यानें ही मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाऊ लागली.  या मुलांची नेमकी हीच अडचण ओळखून प्रतीक जयंत पाटील यांनी विद्यार्थ्यांना  ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल, टॅब, संगणक आणि इंटरनेट सुविधा या मुलभूत गोष्टी उपलब्ध करुन दिल्यात. आज अनेक दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना मोबाईल, टॅब, संगणक घेणे आणि इंटरनेट सुविधा घेणे परवडत नाही. त्यामुळे दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी ते अभ्यासात मागे पडून त्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे. 


म्हणूनच जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मार्गदर्शनानुसार वाळवा तालुक्यातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थ्यांना हे टॅब वाटप करण्यात  आले. या टॅबचे वाटप जयंत पाटील यांच्या  राजारामबापू पाटील नाट्यगृह, इस्लामपूर येथे करण्यात आले.


दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुले शिकली,त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या, तर या कुटुंबांच्या अनेक पिढ्यांचा उध्दार होऊ शकतो. आपण अशी अनके उदाहरणे समाजात बघतो. त्यामुळे आम्ही सुरुवाती पासूनच जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानच्या माध्यमातून दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील मुलांना शिक्षणास सहकार्य व प्रोत्साहन देत आहोत,असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला. केवळ जमीन हेच श्रीमंत होण्याचे माध्यम राहिलेले नाही. ज्ञान हेही एक मोठी संधी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संगणक प्रणालीद्वारे शिक्षण दिले जात आहे. सध्या टॅब्लेट असणे गरजेचे बनले आहे. अमेझॉनच्या मदतीने तालुक्यातील गोर-गरीब मुलांच्या शिक्षणातील हा अडथळा दूर झाला आहे, असेही जयंत पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी अमेझॉन इंडियाने वाळवा तालुक्यातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 250 मुलांना टॅब्लेट दिल्याबद्दल अमेझॉनचे जाहीर आभार मानले.


यावेळी प्रतिक जयंत पाटील,अमेझॉन इंडियाचे इंडिया हेड अक्षय कश्यप,लिडरशिप फॉर इक्वेटीचे संस्थापक व सीईओ मधुकर बानूरी, लिडरशिप फॉर इक्वेटीचे जेष्ठ सल्लागार सलील पोळ, प्रा. शामराव पाटील,पी.आर.पाटील,आर.डी. सावंत,संजय पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.