Election Commission, in Maharashtra : केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission) शुक्रवारपासून (दि.26) दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Elections) तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहे. दोन दिवस महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बैठकांचा आढावा घेऊन निवडणूक संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची उद्या सकाळी दहा वाजता बैठक
निवडणूक आयोग आणि सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची उद्या सकाळी दहा वाजता बैठक होईल. या बैठकीत निवडणुकांच्या संदर्भात चर्चा केली जाईल. त्यानंतर 1 वाजता मुख्य निवडणूक अधिकारी आणि इतर अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेता जाईल. दुपारी तीन वाजता निवडणुकांची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व विभागांशी बैठक घेऊन आढावा घेतला जाईल.
केंद्रीय निवडणूक आयोगाची शनिवारी पत्रकार परिषद
राज्याचे पोलीस महासंचालक,मुख्य सचिव आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासोबत सायंकाळी पाच वाजता बैठक घेऊन आढावा घेतला जाईल आणि त्यांना काही सूचना दिल्या जातील. शनिवारी इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून पत्रकार परिषद घेतली जाईल. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आचारसंहितेबाबत भाष्य केले होते. त्यानंतर आता निवडणूक आयोग महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक दोन किंवा तीन टप्प्यात घेतली जाईल, अशा चर्चा सुरु आहेत. महाराष्ट्राची निवडणूक किती टप्प्यात होणार? हे शनिवारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी, महायुतीनंतर तिसरी आघाडीही मैदानात
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांमध्ये तगडी फाईट होणार असल्याचे बोलले जात आहे. कारण महायुतीतील तीन पक्ष आणि महाविकास आघाडीतील 3 पक्ष आमने-सामने असणार आहेत. शिवाय, शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्याने अनेक विधानसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी एकाच आघाडीत आहेत. त्यामुळे अनेक पक्षांमध्ये बंडखोर उभे राहण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर मतदारांसमोर बच्चू कडू, राजू शेट्टी आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या तिसऱ्या आघाडीचा पर्यायही असणार आहे. तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांकडून मनोज जरांगे पाटील यांना सोबत घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिवाय, मनोज जरांगे पाटील कोणता निर्णय घेणार याकडे हे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या