Ekvira Temple : पुण्यातील एकविरा गडावर 7 ते 10 एप्रिल यादरम्यान चैत्री यात्रा पार पडणार आहे. त्याअनुषंगाने पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुखांनी एक आदेश काढला आहे. यात्रेदरम्यान या भागात कलम 144 अर्थात जमावबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळं दर्शनासाठी एकविरा गडावर जावं की नाही, असा संभ्रम भाविकांमध्ये निर्माण झाला आहे. पण कलम 144 नुसार भाविकांना बंदी नसल्याचं प्रशासनानं सांगितले आहे. एकीकडे सर्व निर्बंध हटवले जात असताना जिल्हाधिकाऱ्यांना काढलेल्या आदेशावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
दरम्यान, आदेश काढण्यामागे काही गंभीर बाबींचा उल्लेखही जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केला आहे. देवीच्या दर्शनासाठी एकविरा गडावर राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं भाविक हजेरी लावतात. यात आगरी आणि कोळी समाजाची संख्या लक्षणीय असते. सदर यात्रा काळात मोठी गर्दी होते. त्यातून भांडण, तंटा, वाद होत असतो. तसेच अनेक भाविक ढोल, ताशे, स्पीकर, इतर वाद्ये आणि फटाके घेऊन येतात. एकसारखे टी शर्ट घालून ग्रुपने एकत्र येतात. पण अशात कोरोनामुळं गेली दोन वर्षे ही यात्रा झाली नाही. त्यामुळं यंदा चैत्री यात्रेला मोठ्या संख्येनं भाविक येण्याची दाट शक्यता आहे.
काय आहे नियमावली?
1) यात्रेदरम्यान शोभेची दारु बाळगणं आणि फटाके फोडण्यास मनाई असेल
2) ढोल, ताशे, इतर वाद्ये गडावर नेण्यास बंदी असेल
3) एकाच प्रकारचे, रंगाचे कपडे (विशेषतः टी शर्ट) घालून वेशभूषा करु नये. वाद होणाऱ्या बाबी टाळाव्यात
4) कोंबडे, बकरे, पशु, पक्षी यांचे बळी देऊ नये, ते मंदिरात सोडू नये.
5) कार्ला लेणी तसेच ऐतिहासिक वास्तू आणि शिल्पांना हानी पोहचविणे अथवा विद्रुपीकरण करु नये.
मात्र, या आदेशामुळं भाविकांनी दर्शनाला यावं की नाही? अशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. कारण कलम 144 म्हटलं की जमावबंदी अशीच सर्वांची धारणा आहे. मात्र, भाविकांना दर्शनासाठी कोणतीच बंदी नसल्याचे प्रशासनाचे म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: