दावोस : अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची महाराष्ट्र दालनात भेट घेतली. यावेळी त्यांच्यात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा क्षेत्र, गुंतवणुकीच्या संधी आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.


बेल्जियम येथील एबीआयएन बेव्ह ही बहुराष्ट्रीय कंपनी महाराष्ट्रात 600 कोटी रुपये (73 दशलक्ष डॉलर) ची गुंतवणूक करणार असून या सामंजस्य करारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे राज्यात शेकडो रोजगार निर्माण होण्यास मदत होणार असून ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रात उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.


शिंडलर समूहाच्या इलेक्ट्रिक कंपनीचे आंतरराष्ट्रीय कार्यान्वयन कार्यकारी उपाध्यक्ष मनीष पंत यांनी दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणुकीच्या क्षेत्राबाबत संवाद साधतानाच औद्योगिक संबंध दृढ करण्याबाबत यावेळी शिष्टमंडळासोबत चर्चा झाली.


दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्या दिवशी संयुक्त अरब अमिरातीचे वाणिज्यमंत्री अब्दुल्ला बिन टौक आणि लुलू हायपरमार्केटचे कार्यकारी संचालक एम.ए. युसुफ अली यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत महाराष्ट्रात असलेल्या गुंतवणुक संधी आणि त्या क्षेत्रात दीर्घकालिन संबंध वाढविण्यावर भर देण्यात आला.


ओमानचे वाणिज्य आणि उद्योगमंत्री कैस बिन मोहम्मद अल युसुफ यांनी मंगळवारी दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी विविध विषयांवर संवाद साधतानाच ओमानच्या डिजिटल परिवर्तनाच्या ‘व्हिजन 2040’ साठी महाराष्ट्र कशाप्रकारे सहकार्य करू शकतो यासंदर्भात चर्चा करण्यात आली.


पहिल्या दिवशी 70 हजार कोटींचे सामंजस्य करार


दावोस (davos) येथे पहिल्या दिवशी राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी 70 हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत अशा दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते. 


ही बातमी वाचा :