सोलापूर : काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी आपल्याला आणि आपली मुलगी प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात येत असल्याचा दावा आज सकाळी केला होता. याबाबतची चर्चा होऊन काही तास उलटत नाही तो भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे शिंदेंच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीला पोहचले आहेत. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आपल्याला आलेल्या भाजप प्रवेशाच्या ऑफरबद्दल सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तर, शिंदे भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच असल्याचे भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले आहेत. काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याला भाजपची ऑफर आल्याने साहजिकच याचे परिणाम राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. यावरून सकाळपासून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहेत. असे असतानाच सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीसाठी चंद्रकांत पाटील दाखल झाले आहेत. सुशीलकुमार शिंदे यांच्या जनवात्सल्य या निवासस्थानी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील पोहचले असून, दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे. तसेच, त्यांच्यात चर्चा देखील होत आहे. मात्र, त्यांच्यात नेमकी काय चर्चा होत आहे, याबाबत माहिती मिळू शकली नाही.
नेमकं काय म्हणाले शिंदे?
अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी येथे झालेल्या हूरडा पार्टी दरम्यान सुशीलकुमार शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, 'माझा दोन वेळा पराभव झाला असला, तरीही प्रणिती ताईला किंवा मला भाजपकडून आमच्या पक्षात या असे सांगितले जात आहे. मात्र, काँग्रेस आमच्या रक्तात असून, आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही. तसेच, आता मी 83 वर्षाचा आहे. त्यामुळे आता मी दुसऱ्याचं बरोबर आहे असं कसं म्हणणार. तसेच, प्रणिती पक्षीय बदलाच्या भानगडीत पडणार नाही. राजकारणामध्ये असे (पराभव) होतं राहतात. पंडित जवाहरलाल नेहरू या माणसासोबत असं झालं. मात्र, परभवाबाबतीत पंडित नेहरू म्हणाले होते की, 'लहान मुलाला सुरुवातीला आधार देऊन चालवावे लागते. नंतर तो स्वतः चालतो. चालताना पडतो पुन्हा उठतो, पुन्हा पडतो पुन्हा उठतो. मग तो जेव्हा चालायला लागतो तेव्हा तो पुन्हा कधी पडत नाही'. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, आज वाईट दिवस आहेत, मात्र ते दिवस निघून जातील, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! सुशीलकुमार शिंदेंसह प्रणिती शिंदेंना भाजपची ऑफर; खुद्द शिंदेंकडूनच गौप्यस्फोट