जळगाव : चाळीस वर्षांच्या काळात अनेक मंत्रिपदं मिळाली, मात्र मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिले म्हणून कोणताही गुन्हा नसताना आपली ही अवस्था झाली, अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा आपली खदखद व्यक्त केली आहे.

आपण मंत्रिपदावर असताना जाती-धर्माच्या आधारावर नव्हे तर मुस्लिम समाज मागास असल्याने सामाजिक भावनेतून  आपण नेहमीच मुस्लिम समाजाच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न केला, असं खडसे सांगत होते. जळगाव जिल्ह्यातील सावदामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित 'एक शाम नाथाभाऊ के नाम' या मुशायराच्या कार्यक्रमात एकनाथ खडसे बोलत होते.

मंत्रिपदावर असताना मुस्लिम वख्त बोर्डाच्या महागड्या जमिनी ताब्यात घेत असताना त्यातील एका जमिनीवरील इमारत पाडण्याची नोटीस दिली होती, ती जमीन अंबानींची निघाली. यावेळी केलेली कारवाई आमच्याकडे काही जणांना आवडली नाही. त्यावेळी मोठा दबावही आला होता. मात्र सामाजिक भावनेतून आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला होता, असंही खडसे म्हणाले.

VIDEO | 'मुख्यमंत्री की ख्वाहिश कि इसलिये तो ये हालत हुई', एकनाथ खडसेंच्या मनातली खदखद पुन्हा उघड

मंत्रिपदाचं काय, येतात आणि जात असतात. 40 वर्षांच्या काळात आपण अनेक मंत्रिपद भूषवली असं खडसे सांगत असतानाच 'पुढील काळात आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं' अशी इच्छा एका मुस्लिम कार्यकर्त्याने व्यक्त केली.

यावर उत्तर देताना, मुख्यमंत्रीही होऊ, मात्र मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहिल्यामुळेच आपण कोणताही गुन्हा केलेला नसतानाही आपली अशी अवस्था झाली, असं सांगत खडसेंनी पुन्हा आपल्याच पक्षाविरोधातील खदखद उघड केली.