कॉपी नाही तर चक्क लव्ह लेटर सापडलं, औरंगाबादमध्ये दहावीच्या परीक्षेदरम्यान प्रकार
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 06 Mar 2019 08:59 AM (IST)
दरम्यान, काल दिवसभरात इंग्रजीच्या पेपरला गैरप्रकार करणाऱ्या अकरा विद्यार्थ्यांविरोधात भरारी पथकाने कारवाई केली.
औरंगाबाद : राज्यात सध्या दहावी आणि बारावीची परीक्षा सुरु आहे. कुठे पेपर तासाभरात व्हाट्सअॅपवर व्हायरल होतोय तर कुठे कॉप्यांचा सुळसुळाट सुरु आहे. यातच औरंगाबादमध्ये एक भन्नाट प्रकार समोर आला आहे. भरारी पथकाला एका दहावीच्या विद्यार्थ्याच्या खिशात चक्क लव्ह लेटर सापडलं आहे. औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील तेलवाडी इथे मंगळवारी (5 मार्च) हा प्रकार घडला. इथल्या दहावीच्या परीक्षा केंद्रावर भरारी पथक दाखल झालं होतं. इंग्रजी विषयाचा पेपर सुरु होता. यावेळी विद्यार्थ्यांची तपासणी केली असता, त्यात एका मुलाच्या खिशात लव्ह लेटर सापडलं. एकीकडे परीक्षा केंद्रावर कॉपीसारखे प्रकार सर्रास घडत असताना, या प्रेमवीराच्या खिशात कॉपीऐवजी लव्ह लेटर पाहून भरारी पथकातील अधिकारीही अचंबित झाले. दरम्यान, काल दिवसभरात इंग्रजीच्या पेपरला गैरप्रकार करणाऱ्या अकरा विद्यार्थ्यांविरोधात भरारी पथकाने कारवाई केली.