पुणे : ‘अंडं आधी की कोंबडी आधी?’ असं गमतीनं विचारलं जातं. परंतु आता ‘अंडं महाग की कोंबडी महाग?’ असं विचारण्याची वेळ आली आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये अंड्यांच्या दरांमध्ये सातत्याने झालेली वाढ. सध्या एका अंड्यासाठी सात ते साडेसात रुपये मोजावे लागत आहेत. त्याच्या तुलनेत चिकन मात्र स्वस्त झालं आहे.

हिवाळा सुरु झाला की प्रत्येक वर्षी अंड्यांच्या दरांमध्ये वाढ होतच असते. मात्र यावेळी झालेली वाढ आश्चर्यचकित करणारी आहे. जे अंडं काही दिवसांपूर्वी चार ते साडेचार रुपयांना मिळत होतं, तेच अंडं आता सात ते साडेसात रुपयांना विकलं जातं आहे.

अंड्यांच्या मागणीमध्ये वाढ झालेली असली तरी त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्यानं ही वाढ झाल्याचं सांगितलं जातं आहे. अंड्यांच्या या दरवाढीसाठी कारणं जरी काहीही सांगितली जात असली, तरी नोव्हेंबर महिन्यात अचानक झालेली ही वाढ आतापर्यंतची सर्वोच्च वाढ आहे.

ऑक्टोबर महिन्यात शंभर अंड्यांसाठी 415 रुपये मोजावे लागत होते. मात्र आता त्यासाठी 519 रुपये मोजावे लागत आहेत.

दुसरीकडे ब्रॉयलर चिकनचे दर मात्र सातत्यानी कमी होत आहेत. सध्या एक किलो ब्रॉयलर चिकनसाठी 130 ते 135 रुपये मोजावे लागत आहेत. अंड्यांच्या वाढलेल्या दरांची तुलना चिकनच्या दरांशी होत असली तरी अंडं देणारी कोंबडी आणि खाण्यासाठी वापरली जाणारी  ब्रॉयलर कोंबडी यांच्यामध्ये फरक आहे.

अंड देणारी कोंबडी 18 आठवड्यांची झाल्यानंतर अंडं देण्यास सुरुवात करते, तर या उलट ब्रॉयलर कोंबडी जन्मल्यानंतर 40 ते 42 दिवसांमध्ये 2 किलोपर्यंत वाढून खाण्यायोग्य होते.

थंडीमध्ये ब्रॉयलर कोंबडीच्या वाढीचा वेग आणि वजन या दोन्हींमध्ये वाढ होते. थंडीच्या दिवसांमध्ये  35 ते 38 दिवसांमध्ये कोंबडीच वजन अडीच किलोपर्यंत वाढतं. त्यामुळे सहाजिकच चिकनचं उत्पादन वाढून दर कमी झाले आहेत.

अंड्यांच्या वाढलेल्या दरांमुळे साहजिकच अंड्यांच्या मागणीमध्ये घट झाली आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यांमध्ये अंड्यांच्या किंमतीही कमी होण्याची शक्यता आहे.

इतर सर्व वस्तूंप्रमाणे मागणी आणि पुरवठ्याचे नियम चिकन आणि अंड्यांनाही लागू होतात. परंतु बाजारपेठेच्या चढ-उतारांबरोबरच अंडी आणि चिकनच्या दरांवर सण, उत्सव, उपवासाचे दिवस अशा गोष्टींचाही परिणाम होत असतो.

जुलै महिन्यापासून वेगवेगळे सण सुरु होतात. श्रावण महिना, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी आणि आता नुकताच सुरु झालेला मार्गशीर्ष महिन्यात शाकाहारी राहण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे या काळात चिकनची मागणी घटते. अंडयांच्या बाबतीत मात्र अंड हे व्हेज की नॉनव्हेज हा वाद आता संपुष्टात येऊन अनेकजण अंड्याचा समावेश शाकाहारामध्ये करतात. त्यामुळे प्रत्येक हंगामात अंड्यांना मागणी असते.