वायरल सत्य | 'ती' अंडी प्लास्टिकची नव्हे, उष्णतेचा परिणाम
एबीपी माझा वेब टीम | 06 Jun 2019 11:28 PM (IST)
उष्णतेमुळे अंड्याच्या आतील आर्द्रतेचं प्रमाण कमी होऊन ती वजनाने हलकी होतात. परिणामी, अंडी उकडली जातात, तेव्हा पिवळा भाग काहीसा कडक आणि रबरासारखा होतो.
सांगली : अंड्यातून प्लास्टिकसारखे द्रव्य निघतानाचा व्हिडीओ वायरल झाला आणि देशात प्लास्टिकची बनावट अंडी तयार होत असल्याचे मेसेज वायरल होऊ लागले. त्यात सांगलीतील एका कुटुंबाने अंडी खरेदी केली असता त्यांनाही असाच अनुभव आला. मात्र ही अंडी प्लास्टिकची नसून उष्णतेमुळे अशी झाल्याचं आता समोर आलं आहे. महाराष्ट्रात सूर्य आग ओकत असल्याचा फटका आता अंड्यांनाही बसला आहे. उष्णतेमुळे अंड्याच्या आतील आर्द्रतेचं प्रमाण कमी होऊन ती वजनाने हलकी होतात. परिणामी, अंडी उकडली जातात, तेव्हा पिवळा भाग काहीसा कडक आणि रबरासारखा होतो. मात्र, तापमान सामान्य असते तेव्हा असे प्रकार घडत नाहीत. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने तपासणीनंतर ही माहिती दिली आहे. या प्रक्रियेत अंड्यांच्या पोषणमूल्यात काहीही बदल होत नाही. पूर्वीसारखीच त्यातील पोषकता सुरक्षित राहते. साधारपणे ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात कमी मागणीमुळे अंडी शीतगृहात साठवली जातात. पुढे थंडी वाढल्यानंतर ती बाजारात येतात. काय झालं होतं? सांगलीच्या बुधगावमधील ज्ञानेश्वरनगर परिसरातील दुकानातून युवराज साठे यांनी अंडी खरेदी केली होती. ती शिजवत असताना फुटू लागली आणि भांड्यात साबणासारखा फेस तयार होऊन प्लॅस्टिक जळाल्यासारखा वास येऊ लागला. पुन्हा खात्री करण्यासाठी त्यांनी दुसऱ्या दुकानातून अंडी आणून शिजवली असता ती चांगली निघाली.