मुंबई : शालेय शिक्षण विभागामार्फ़त आता तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात मागच्या 5 वर्षांपासून काम करणारी सलाम बॉम्बे फौंडेशन संस्था शिक्षण विभागाला या अभियानात मदत करणार आहे. राज्य सरकारने यासंबंधीचं एक परिपत्रक आज जारी केलं आहे.


राज्यातील शालेय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये हे अभियान राबविण्यात यावे असे शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात सांगण्यात आलं आहे. यात प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेत तंबाखूबंदीबाबत माहिती सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व्यवस्थापन समिती यांना द्यायची आहे. शिवाय याबाबत माहिती सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांनी वाचूनही दाखवायची आहे.

याशिवाय मुख्यध्यापकांनी तंबाखू नियंत्रण कायदा, 2003 आणि अध्यादेश याची प्रत शाळेच्या वेबसाइटवर अपलोड करुन 100 यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी असून शाळा परिसरात तंबाखू सेवनावर बंदी असल्याचा बोर्ड शाळेच्या मुख्य ठिकाणी लावायचा आहे. तंबाखू बंदी अभियानात शाळेत डॉक्टर किंवा वैद्यकीय अधिकारी यांचे चर्चासत्र ठेवून त्यात तंबाखू आणि त्यामुळे होणारा कॅन्सर यबाबत माहिती द्यायची आहे.

इतकंच नाही तर तंबाखूबंदी अभियानात शाळेत पोस्टर्स लावून तंबाखूबंदीबाबत जास्तीत जास्त जनजागृती करण्याचं काम शिक्षकांनी करायचं आहे. हे सर्व निकष पूर्ण झाल्यावर त्या शाळेने तंबाखूमुक्त शाळा किंवा तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था असे फलक मुख्य प्रवेशद्वारासमोर लावून घोषित करायचं आहे.