नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राजधानी दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची भेट घेतली. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचं नुकसान भरुन काढण्यासाठी वैद्यकीय शाखेच्या जागा वाढवून देण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली.

डॉ. हर्ष वर्धन यांना राज्य सरकारच्या वतीने एक विनंतीपत्र मुख्यमंत्र्यांनी यावेळी सादर केलं. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शाखेच्या 813 जागा, तर पदवी शाखांमध्ये 1740 जागा वाढवून देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. या मागणीवर सकारात्मक आणि वेगाने कार्यवाही करण्याचं आश्वासन डॉ. हर्ष वर्धन यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिलं.


दुष्काळी उपाययोजनांची दिली माहिती

भाजपाध्यक्ष अमित शाह यांचीही देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली. विविध विषयांवर चर्चा करतानाच केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळालेली दुष्काळ निवारणासाठीची मदत आणि राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी त्यांना दिली.


राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात नव्याने कुणाचा सहभाग करायचा, तसंच रावसाहेब दानवेंच्या खासदारकीनंतर राज्यात भाजप प्रदेशाध्यक्षपदी कुणाला संधी द्यायची याबाबत दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. याआधी रावसाहेब दानवे आणि महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनीही दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती.