Education Minister Varsha Gaikwad : विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या त्रास देणाऱ्या किंवा त्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या शैक्षणिक संस्थांची गय केली जाणार नाही, असा इशारा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला आहे. शालेय शिक्षण विभागाने दिलेले निर्देश झुगारून विद्यार्थ्यांना फी न भरल्यामुळे  वर्गाच्या बाहेर बसवल्याप्रकरणी कांदिवली पश्चिम येथील कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


कांदिवली पश्चिम येथील कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूल आणि पुण्याच्या उंड्री येथील युरो स्कूलमध्ये फी भरली नसल्याने विद्यार्थ्यांना वेगळी वागणूक दिली जात होती. त्यांना वर्गाबाहेर उभे केले जात असे. तसेच इतर विद्यार्थ्यांसमोर अपमानित करून मानसिक त्रास दिला जात असे. अशा प्रकारच्या तक्रारी मिळाल्यामुळे शालेय शिक्षण विभागामार्फत याची तातडीने दखल घेण्यात आली. तक्रारीनंतर कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर युरो स्कूलबाबत उपसंचालक पुणे यांनी भेट देऊन चौकशी केली असून शाळेला नोटीस देण्यात आली आहे. अशा प्रकारच्या घटना ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये घडली त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा वर्षा गाडकवाड यांनी दिला आहे.  


कांदिवलीच्या कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता नववी आणि दहावीच्या दहा ते पंधरा विद्यार्थ्यांना शालेय फि भरली नाही म्हणून 1 एप्रिल रोजी वर्गात बसू न देता दिवसभर लॅबमध्ये बसवण्यात आले. त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या पालकांनी कांदिवली पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली. त्यानंतर या शाळेच्या प्राचार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


कोरोनाच्या निर्बंधांमुळे यावर्षी शैक्षणिक अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्यात आला आहे. शिवाय कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. या काळात शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी काही विद्यार्थ्यांना विलंब झाला. ही परिस्थिती विचारात घेऊन विद्यार्थ्यांना मानसिक दृष्ट्या आधार द्यावा, तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले होते.


विद्यार्थ्यांना सापत्न वागणूक देणे, वर्गाबाहेर उभे करणे, मानसिक त्रास देणे, त्यांचे शैक्षणिक नुकसान होईल अशी कृती करणाऱ्या शाळांची गय न करता त्यांच्याविरूद्ध कडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्वाच्या बातम्या



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI