Who Was Haren Pandya : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याशी संबंधितांची मालमत्ता आज ईडीने जप्त केली. ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली. ही टीका करताना संजय राऊत यांनी आपला हरेन पांड्या करण्याचा कट आखला असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, मॉर्निंग वॉकला गेल्यावर माझ्यावर झाडण्यात येणाऱ्या गोळ्या हल्लेखोरांवर उलटतील असे राऊत यांनी म्हटले.
संजय राऊत यांनी उल्लेख केलेले हरेन पांड्या होते तरी कोण? त्यांचा उल्लेख करून संजय राऊत यांनी कोणावर निशाणा साधलाय, याची चर्चा सुरू झाली आहे.
हरेन पांड्या भाजपचे गुजरातमधील दिग्गज नेते होते. त्यांनी आपली राजकारणाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून केली. त्यानंतर त्यांनी भाजपची धुरा हाती घेत अहमदाबादमध्ये आपली पकड मजबूत केली.
अहमदाबादच्या पाळदी भागातून ते नगरसेवक होते. भाजपचे बडे नेते केशुभाई पटेल यांचे ते निकटवर्तीय होते. सन 1998 साली केशुभाई जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी हरेन यांना थेट गृहमंत्री केलं होतं. केशुभाई यांना 2001 मध्ये मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात आल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्याकडे गुजरातचे मुख्यमंत्रीपद आले. मोदी यांच्या मंत्रिमंडळात हरेन पांड्या यांना महसूल खात्याचा पदभार देण्यात आला. मोदी आणि पांड्या यांच्यात सुरुवातीपासून चांगले संबंध नव्हते असे म्हटलं जायचं. पांड्या हे केशुभाई पटेल यांच्या गटातील समजले जात होते.
पांड्या-मोदी संघर्षाची ठिणगी
नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले तेव्हा ते आमदार नव्हते. त्यामुळे सहा महिन्यात त्यांना विधानसभेवर निवडून जाणे आवश्यक होते. नरेंद्र मोदी आपल्या पहिल्या निवडणुकीसाठी सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात होते. त्यावेळी त्यांचे लक्ष हरेन पांड्या यांच्या मतदारसंघावर गेले. पांड्या यांनी मोदींसाठी हा मतदारसंघ सोडण्यास नकार दिला होता. यावरून दोन्ही नेत्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली असल्याचे 'कारवान' या मासिकाने भाजप नेत्याच्या हवाल्याने आपल्या एका वृत्तात नमूद केले होते. डिसेंबर 2002 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानही या दोन्ही नेत्यांमध्ये वाद सुरू होता.
गुजरातमध्ये 2002 मध्ये मोठी धार्मिक दंगल उसळली होती. सन 2002 च्या गोध्रा घटनेनंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हरेन पंड्या यांनीच कारसेवकांचे मृतदेह उघड्या ट्रकमधून अहमदाबादला हलवण्यास विरोध केला होता. त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि नंतर तेच झाले. हरेन पांड्या हे पीडित कुटुंब आणि मुस्लिम नेत्यांना एकाच मंचावर आणून शांततेची चर्चा करू शकले असते. तेवढी त्यांची क्षमता होती अशी चर्चा होती. काहींनी दावेही केले आहेत. मात्र, त्यावेळी गुजरात सरकारकडून त्यांना बैठकीत गप्प बसवण्यात आले.
हरेन पांड्या यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, 27 फेब्रुवारी 2002 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थानी एक मीटिंग घेत पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांना दंगलीत न पडण्याचा आणि लोकांना त्यांच्या भावना व्यक्त करू द्या असा आदेश दिला असल्याचे म्हटले होते.
पांड्या यांची हत्या
हरेन पांड्या यांची 26 मार्च 2003 रोजी सकाळी 07:40 वाजता गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अहमदाबादमध्ये सकाळी मॉर्निंग वॉक करताना त्यांच्या अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. हल्ला झाल्यानंतरही त्यांचा मृतदेह दोन तास त्यांच्या कारमध्ये तसाच होता.
यानंतर डीएनए या वृत्तपत्राने गुजरात पोलिसांच्या सूत्रांच्या हवाल्याने एक बातमी प्रसिद्ध केली. पांड्याच्या हत्येत सोहराबुद्दीन शेख आणि तुलसीराम यांचा वापर झाला असावा, असे वृत्ता नमूद करण्यात आले. गुजरात पोलिसांनी कथित 'बनावट चकमकीत' दोन्ही हल्लेखोरांना ठार केले. पोलिस सूत्रांचा हवाला देत डीएनएने वृत्तात लिहिले की, पांड्याला मारण्याचे काम प्रथम सोहराबुद्दीनला देण्यात आले होते, परंतु तो मागे पडल्यानंतर तुलसीरामने ते पार पाडले.
संजीव भट्ट यांचा दावा
माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांनीही असाच दावा केला आहे. 2003 मध्ये ते साबरमती कारागृहाचे अधीक्षक होते आणि तेथील कैद्यांमध्ये ते खूप लोकप्रिय झाले होते. त्यांनी कैद्यांसाठी मानवीय दृष्टीकोणातून काही प्रयोग सुरू केले होते. कैद्यांमध्ये सकारात्मक बदल घडू लागला होता. येथेच एका कैद्याने हरेन पांड्याच्या हत्येत सोहराबुद्दीन आणि तुलसीराम यांचा हात असल्याचे सांगितले.
भट्ट यांनी ही माहिती अमित शाह यांना दिली होती. तेव्हा संजीव भट्ट यांच्या दाव्यानुसार, 'फोनवरील त्यांचा आवाज खूप त्रासदायक वाटत होता. त्यांनी मला याबाबत कोणाला सांगू नको असे सांगितले. काही वेळानंतर भट्ट यांनी अमित शहा यांना पत्र लिहिले. हरेन पांड्या यांच्या हत्येमागे सोहराबुद्दीन आणि काही पोलिसांची भूमिका नमूद करण्यात आली होती. या पत्रानंतर भट्ट यांची साबरमती कारागृहातून तत्काळ बदली करण्यात आली. काही कालावधीनंतर त्यांना निलंबित करण्यात आले. संजीव भट्ट यांची साबरमती कारागृहातून बदली झाल्यामुळे संतप्त झालेल्या सुमारे २ हजार कैद्यांनी उपोषण केले होते, अशी माहिती 'द लल्लनटॉप' या वृत्तसंकेतस्थळाने दिली. संजीव भट्ट सध्या हे एका अतिशय जुन्या प्रकरणात तुरुंगात आहेत.
हरेन पांड्या हत्येची चौकशी कोणी केली?
हरेन पांड्या यांच्या हत्येची चौकशी गुजरातचे पोलीस अधिकारी डी.जी. वंजारा यांनी केली होती. वंजारा यांच्यावर नंतर इशरत जहां, सोहराबुद्दीन शेख, तुलसीराम प्रजापती यांना बनावट एन्काउंटरमध्ये ठार केल्याचा आरोप करण्यात आला होता. डी. जी. वंजारा हे अमित शहाचे निकटवर्तीय असल्याची चर्चा सुरू असते. सीबीआयने सन 2010 मध्ये अमित शाह यांना तुलसीराम प्रजापती एन्काउंटर प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर काही वर्षांनी अमित शाह यांना दोषमुक्त करण्यात आले.