Maharashtra Politics: ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल एक मोठा दावा केला होता. पण काही काळातच त्यांनी आपल्या वक्तव्यावरुन युटर्न घेतला आहे. रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? असं पवार एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबद्दल बोलताना म्हणाले होते, असं वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलं होतं. एका कार्यक्रमात बोलताना अरविंद सावंत यांनी हा दावा केला आहे. मात्र एबीपी माझानं यासंदर्भात बातमी दाखवल्यावर अरविंद सावंत यांनी पूर्णपणे यू-टर्न घेतला. रिक्षावाला शब्द शरद पवारांनी वापरला नाही, तो शब्द माझा आहे. एकनाथ शिंदेंच्या हाताखाली काम करणार का? असं पवार म्हणाले होते, अशी सारवासारव अरविंद सावंत यांनी केली आहे. 


सभेत बोलताना काय म्हणाले होते अरविंद सावंत? 


ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत बोलताना म्हणाले की, "महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या वेळी शरद पवार म्हणाले होते की, काँग्रेसमध्ये दोन-दोन मुख्यमंत्री आहेत. पृथ्वीराज चव्हाण आहेत, अशोक चव्हाण आहेत. राष्ट्रवादीत दिग्गज आहेत, छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार. तर या रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? याच्या हाताखाली तुम्ही काम करणार का? तरी उद्धव ठाकरेंनी नाव दिलं होतं. नाही, मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेच. पण त्यानंतर शरद पवारांनी गळ घातली. उद्धव ठाकरे हे शिवधनुष्य तुम्हालाच घ्यावं लागेल. आपण काय रणांगणातून पळणारे नाही ना. मग उद्धवजींनी शरद पवारांचा शब्द स्वीकारला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले."


पाहा व्हिडीओ : रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? शरद पवारांनी म्हटल्याचा दावा, मात्र नंतर अरविंद सावंतांचा यु-टर्न 



अरविंद सावंत यांचा घुमजाव 


सभेत केलेल्या वक्तव्यासंदर्भात एबीपी माझानं खासदार अरविंद सावंत यांच्याशी संवाद साधला. 'रिक्षावाला' असा उल्लेख शरद पवारांनी केलेला होता की, बोलण्याच्या ओघात तुमच्याकडून झालेला आहे, असं अरविंद सावंत यांना एबीपी माझानं विचारलं. त्यावेळी त्यांनी आपल्या वक्तव्यावरुन घुमजाव केला. ते म्हणाले की, "शरद पवारांनीच उद्धव ठाकरेंना आग्रह केला की, तुम्हीच मुख्यमंत्री व्हायला हवं. कारण तुमच्याशिवाय हे शिवधनुष्य कोण पेलणार? कारण ही सर्व दिग्गज मंडळी आहेत. तुम्ही जे नाव सुचवताय त्यांच्यासोबत एकत्र काम करणं शक्य नाही. ही वस्तूस्थिती आहे. शिंदे रिक्षावालेच होते. त्यामुळे आम्ही तो शब्द वापरतोच." त्यानंतर पुढे बोलताना ते म्हणाले की, "रिक्षावाला' असा उल्लेख मी केलेला आहे. तो पवारांनी वापरलेला शब्द नाही, हे जाहीरपणे सांगतो. शरद पवारांची भाषा नाही ती, ही शिवसैनिकांची भाषा आहे.