Ajit Pawar : केंद्र आणि राज्य सरकार तुमच्या ताब्यात आहे. त्यामुळं छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) झालेल्या राड्याचा तपास करा, 'दूध का दूध पानी का पानी' होऊन जाऊद्या असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. हे खासदार अनिल बोंडेंना (Anil Bonde) सांगा असंही अजित पवार म्हणाले. अजित पवारांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा हात असल्याचे वक्तव्य भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केलं होतं. याबाबत प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला प्रत्युत्तर देताना अजित पवार संतापल्याचे पाहयाला मिळाले. राजकारण कोणत्या थराला जात आहे. 


सुत्रधार कोण आहे त्याच्यावर कडक शासन करा


चौकशी करण्याचे काम हे पोलिस यंत्रणेचं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्याबाबत वेगवेगळ्या पक्षाची नावं घेण्यापेक्षा याची चौकशी करावी. कोणी घडवलं? का घडवलं? याची चौकशी करावी असे अजित पवार म्हणाले. त्यामागचा सुत्रधार कोण आहे त्याच्यावर कडक शासन झालं पाहिजे. त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होता कामा नये असेही अजित पवार म्हणाले. 


जनतेच्या पैशातून राज्य सरकारची जाहीरताबाजी 


जनतेच्या पैशातून राज्य सरकारची जाहीरताबाजी सुरु असल्याचे अजित पवार म्हणाले. त्यांच्याकडे सध्या दुसरे कोणतेही मुद्दे राहिले नाहीत. एखाद्या योजनेची जाहीरात देऊन लोकांना माहिती दिली असेल तर ते ठिक आहे. पण सध्या जाहीरातबाजी सुरु असल्याचे अजित पवार म्हणाले. 


प्रत्येक सभेला प्रत्येक जण उपस्थित असेल असे नाही


प्रत्येक सभेला प्रत्येक जण उपस्थित असेल असे नाही. एक धोरण स्वीकारले आहे. प्रत्येक पक्षाचे दोन नेते बोलतील असे अजित पवार म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे कालच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेला गैरहजर होते. त्याबाबत अजित पवारांना विचारण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. भाषण झाल्यानंतर बाळासाहेब थोरात लगेच गेले होते. मात्र, त्यांन पुढे सुरतला जायचे असल्यानं ते लवकर गेल्याचे अजित पवार म्हणाले. याबाबत त्यांनी आम्हाला सांगितले होते असे अजित पवार म्हणाले.


भाजप आणि शिंदे गटाची सावरकर गौरव यात्रा हे निव्वळ राजकारण 


सावरकरांना भारतरत्न देण्याची वेळ कधी येणार? तुम्ही काय मुहूर्त बघता काय? असा सवाल अजित पवारांनी सरकारला केला. भाजप आणि शिंदे गटाची सुरु असलेली सावरकर गौरव यात्रा हे निव्वळ राजकारण असल्याचेही अजित पवार म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


Uddhav Thackeray : स्टेजवर येताच आतषबाजी अन् बसायला 'विशेष खुर्ची', काँग्रेस-राष्ट्रवादीकडून उद्धव ठाकरेंचं नेतृत्व अधोरेखीत