मुंबई: पत्रा चाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडीची कस्टडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता चार दिवसांत ईडीला संजय राऊत यांच्याविरोधात प्रबळ पुरावे गोळा करावे लागणाल आहेत. संजय राऊत आठ दिवसांची रिमांड मिळावी अशी मागणी ईडीने केली होती. तर संजय राऊत यांच्याकडे सर्व पैसा हा वैध मार्गांने आला आहे, त्यांच्यावर खोटी केस दाखल करण्यात आली आहे, तसेच संजय राऊत हे हार्ट पेशंट आहेत त्यामुळे त्यांना कमी दिवसांची रिमांड द्यावी अशी मागणी संजय राऊत यांच्या वकिलांनी केली होती. 


संजय राऊत हे हार्ट पेशंट असल्याने रात्री साडे दहा वाजल्यानंतर त्यांची चौकशी करणार नाही असं ईडीने न्यायालयाला सांगितलं आहे. 


ईडीच्या वकिलांचा युक्तीवाद
पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचा थेट हात असून प्रविण राऊत यांच्या माध्यमातून संजय राऊत यांनी पैसा मिळवला असल्याचा आरोप ईडीने केला होता. तसेच या प्रकरणात संजय राऊत यांनी दोन साक्षीदारांना धमकावल्याचं ईडीने न्यायालयाला सांगितलं होतं. संजय राऊत यांना जर सोडलं तर ते पुन्हा तशा प्रकारचं कृत्य करु शकतात, त्यामुळे त्यांना आठ दिवसांची रिमांड देण्यात यावी अशी मागणी ईडीकडून करण्यात आली होती. 


महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर कारवाई, राऊतांच्या वकिलांचा आरोप
2020 मध्ये मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने याचा तपास सुरु केला होता, पण त्यावेळी त्यामध्ये कोणतेही गैरकृत्य आढळले नाही. पण आता सत्तांतर झाल्यानंतर ही राजकीय आकसापोटी कारवाई केली जात आहे असं संजय राऊत यांच्या वकिलांनी दावा केला. महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे याकडे राऊत यांच्या वकिलांनी लक्ष वेधलं आहे.


ईडी राजकीय दबावामध्ये काम
ईडी सध्या राजकीय दबावाखाली काम करत असून संजय राऊत यांच्यावरील कारवाई हा त्याचाच भाग असल्याचा दावा राऊत यांच्या वकिलांनी केला. 


संजय राऊतांकडे त्यांच्या कंपनीतून वैध मार्गाने पैसा
संजय राऊत यांच्या काही कंपन्या आहेत, त्यांच्याकडे वैध मार्गातून पैसा आला आहे. त्यातूनच सर्व संपत्ती मिळवली असल्याचं संजय राऊत यांच्या वकिलांनी सांगितलं.