दिल्ली मद्यविक्री धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे (आप) नेते अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने 21 मार्च रोजी ही कारवाई केली आहे. केजरीवाल यांच्या अटकेनंतर आपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. या कार्यकर्त्यांकडून देशभरात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. याच अटकेवर आता केजरीवाल यांचे कधीकाळचे सहकारी अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी प्रतिक्रिया दिलीय.
अण्णा हजारे नेमकं काय म्हणाले?
मी मद्यधोरणावर अनेकवेळा पत्र लिहिले. माझा पत्र लिहिण्याचा उद्देश एकच होता. आज दारूमुळे महिलांवर अन्याय होतात. अत्याचार होतात. याला आळा बसला पाहिजे. दारूमुळे खूनदेखील होतात. दारुची ही नीती संपवली पाहिजे. परंतु हे अरविंदच्या डोक्यात बसलं नाही. शेवटी त्यांनी मद्यविक्री धोरण जारी केले. शेवटी त्याच मद्यनीतीमुळे त्याला अटक झाली. त्यामुळे आता तो आणि सरकार बघून घेतील. ज्यांची चूक झाली त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे, अशी रोखठोक भूमिका अण्णा हजारे यांनी घेतली.
21 मार्चच्या रात्री केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई
याआधी ईडीने अरविंद केजरीवाल यांना मद्यविक्री धोरण घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी अनेकवेळा समन्स जारी केले होते. मात्र केजरीवाल प्रत्येकवेळी वेगवेगळे कारण देत अनुपस्थित राहिले. याच प्रकरणी अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने 21 मार्च रोजी ही याचिका फेटाळली. त्यानंतर ईडी अचानक अॅक्शन मोडमध्ये आली. ईडीचे पथक 21 मार्च रोजी केजरीवाल यांच्या निवासस्थानी घडकले. त्यानंतर केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई केली जाऊ शकते, अशी शंका व्यक्त केली जात होती. शेवटी ही शंका खरी ठरली. 21 मार्चच्या रात्री केजरीवाल यांना ईडीने अटक केली.
महाराष्ट्रातही आपचे कार्यकर्ते आक्रमक
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर आम आदमी पार्टीकडून देशभरात निषेध व्यक्त केला जात आहे. या अटकेचे महाराष्ट्रातही पडसाद उमटत आहेत. नाशिकमध्ये मेहेर सिग्नल परिसरात रास्ता रोको करण्यात आला. यावेळीटायर जाळत निषेध व्यक्त करण्यात आला. कोल्हापूरमध्येही आपच्या कार्यकर्त्यांनी येथे आंदोलन केले. आपचे कार्यकर्ते थेट भाजपच्या कार्यालयाकडे कुच करत होते. मात्र यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांची धरपकड केली. कोल्हापुरातील महावीर कॉलेज चौकातून आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते हे बीजेपी कार्यालयावर आंदोलनासाठी निघाले होते. त्यांना कोल्हापूर पोलिसांनी बळाचा वापर करत रोखलेला आहे. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पोलिसांनी आंदोलकांना रोखत अक्षरशः जबरदस्तीने उचलून गाडीत टाकले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आजचा कार्यकर्त्यांनी केली