(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ई-डेस्क, ई-पोडियम, इंटरअॅक्टिव्ह स्क्रीन; नगरमधील पानोली झेडपी शाळेत फ्युचरीस्टिक क्लास रुम
ई-डेस्क, ई-पोडियम, इंटरअॅक्टिव्ह स्क्रीन असं दृश्य पानोली इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतलं. पानोलीच्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून ही 'फ्युचरीस्टिक क्लास रुम' उभी केली. यासाठी 40 लाख रुपये खर्च करण्यात आला
अहमदनगर : जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की तुमच्या नजरेसमोर काय चित्र उभं राहतं याची कल्पना आम्हाला आहे. पण आता जिल्हा परिषदेच्या शाळांचे चित्र बदलतं आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा केवळ डिजिटलच होत नाहीत तर त्यात अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना राबवल्या जात आहेत. अशीच 'फ्युचरीस्टिक क्लास रुमची संकल्पना राबवली आहे अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील पानोली जिल्हा परिषद शाळेने.
ई-डेस्क, ई-पोडियम, इंटरअॅक्टिव्ह स्क्रीन असं दृश्य पानोली इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पाहायला मिळतं. पानोलीच्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून ही 'फ्युचरीस्टिक क्लास रुम' उभी केली आहे. यासाठी तब्बल 40 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. या क्लासरुममध्ये प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र ई-डेस्क आहेतर शिक्षकांसाठी ई-पोडियम. आता विद्यार्थ्यांच्या हातात वह्या-पुस्तकांऐवजी इंटरअॅक्टिव्ह स्क्रीन देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा प्रत्येक डेस्क हा FCMS या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शिक्षकांच्या पोडियमशी जोडला गेला आहे. विद्यार्थ्यांच्या ई-डेस्कमध्ये अभ्यासक्रमातील सर्व धडे रंजकपद्धतीने स्टोअर करुन ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतरही अॅक्टिव्हिटी त्यात आहेत. शिक्षक हे आपल्या पोडियमवरुन प्रत्येक विद्यार्थ्यांवर लक्ष देऊ शकतात त्यांना सूचना देऊ शकतात.
जिल्हा परिषद शाळा म्हटलं की, भौतिक सुविधांचा अभाव अशी ओळख आता पुसत आहे. पानोलीसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा शहरी मुलांच्या बरोबरीने किंबहूना त्यांच्यापेक्षा पुढे जाऊन संगणक हाताळत आहेत हे पाहून पालकांनाही समाधान वाटत आहे.
FCMS या सॉफ्टवेअरमध्ये Interactive Teaching, Power Management Effective Control, Teaching Evaluation, Screen Broadcast, Annotation Tool, Student Demonstration, Interactive Whiteboard ची सुविधा आहे.अतिशय रंजक पद्धतीने अभ्यासाचे धडे गिरवताना विद्यार्थ्यांनाही आनंददायी शिक्षणाचा अनुभव मिळत आहे.
ही फ्युचरीस्टिक क्लासरुम संकल्पना राबवण्यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या या संकल्पनेला पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी 5 लाखांची देणगी देऊन चालना दिली आणि ग्रामस्थांनीही भरभरुन लोकसहभाग देत तब्बल 40 लाखांचा निधी जमा केला आणि उभी राहिली 30 विद्यार्थ्यांची आसन क्षमता असलेली वातानुकूलित फ्युचरीस्टिक क्लासरुम.
पानोली जिल्हा परिषदेत उभारण्यात आलेली ही फ्युचरीस्टिक क्लासरुम हा पायलट प्रोजेक्ट असून इतरही गावांनी लोकसहभागी होण्याची तयारी दर्शवली तर हा प्रकल्प प्रत्येक शाळेत राबवण्याचा शासनाचा मानस आहे.