कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना बाणेदार उत्तर देत खडसावणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांना गुन्हे अन्वेषणातील गुणवत्तेसाठी गृहमंत्री पदक जाहीर करण्यात आले आहे.  महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हे अन्वेषणातील गुणवत्तेसाठी गृहमंत्री पदक जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने 25 राज्य, केंद्रशासित प्रदेश व केंद्रीय तपास यंत्रणेत कार्यरत असणाऱ्या 101 पोलीस अधिकाऱ्यांना गृहमंत्री पदक जाहीर केले आहे. महाराष्ट्रातील 11 पोलिसांचा यात समावेश आहे. यात गुरव यांचाही समावेश आहे.


घरी किंवा गडचिरोलीला जायची तयारी आहे, माजी मंत्र्यांना डीवायएसपीचा दणका !

कोल्हापूर महापालिकेच्या महापौर निवडीवेळी महापालिकेत नगरसेवक वगळता इतरांना प्रवेश नव्हता. त्यामुळे बंदोबस्तावर असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांनी आमदारद्वयीला महापालिकेत प्रवेश करण्यास मज्जाव केला होता. त्याला मुश्रीफ यांनी विरोध केला होता. यावरून त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली होती.  यावेळी सुरज गुरव यांनी बाणेदारपणे उत्तर देत त्यांना सांगितले की 'एकतर घरी नाहीतर गडचिरोलीला जायची तयारी करतो , पण भीती घालू नका. आम्ही कर्तव्य बजावत आहोत, राजकारण करत नाही. साहेब, आम्हाला राजकारण करायचे नाही, कोणाच्या वर्दीवर येण्याची गरज नाही. आपण घरी जावे',  हा व्हिडीओ सोशल माध्यमात वायरल झाला होता. यावेळी गुरव यांच्यावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव झाला होता.

महाराष्ट्रातील खालील पोलीस अधिकाऱ्यांना गृहमंत्री पदक  

राज तिलक रोशन ( पोलीस उपायुक्त), दिपक पुंडलिक देवराज (पोलीस उपायुक्त), सुरज पांडुरंग गुरव (पोलीस उपअधीक्षक), रमेश नागनाथ चोपडे( सहाय्यक पोलीस आयुक्त), दिनेश विठ्ठलराव आहेर (पोलीस निरीक्षक), शशिराज गुंडोपंत पाटोळे ( पोलीस निरीक्षक), चिमाजी जगन्‍नाथ आढाव (पोलीस निरीक्षक), सुरज जयवंत पडावी ( पोलीस निरीक्षक), सुनिल किसन धनावडे ( पोलीस निरीक्षक), सचिन मुरारी कदम (पोलीस निरीक्षक) आणि धनंजय चित्‍तरंजन पोरे (सहाय्यक पोलीस निरीक्षक) यांचा समावेश आहे.

घरी किंवा गडचिरोलीला जायची तयारी आहे, माजी मंत्र्यांना डीवायएसपीचा दणका! | कोल्हापूर | एबीपी माझा