लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ही मोठी घटना मानली जात आहे. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत डॉ. कोल्हे पक्षप्रवेश करण्याची चिन्हं आहेत. छत्रपती संभाजी राजे मालिकेत सध्या डॉ. कोल्हे हे शंभूराजेंची भूमिका साकारत आहेत.
शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची चिन्हं आहेत. तसं झाल्यास शिवसेनेचे विद्यमान खासदार आढळराव पाटलांना जोरदार टक्कर मिळेल.
काही दिवसांपूर्वीच अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर कोल्हेंच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आलं होतं. डॉ. कोल्हेंसोबत आणखी दोन माजी आमदारांचाही राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थित मुंबईत प्रवेश होणार आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर कोल्हेंच्या लोकप्रियतेचा फायदा घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधलं होतं. 19 मार्च 2014 रोजी कोल्हेंनी शिवसेनेचा भगवा हाती धरला होता. त्यावेळी ते मनसेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती.
शिवसेनेतील प्रवेशावेळी (19 मार्च 2014) डॉ. अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
2014 मधील विधानसभा निवडणुकांच्या वेळी कोल्हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. डॉ. अमोल कोल्हेंच्या वक्तृत्वशैलीमुळे श्रोते त्यांच्या भाषणांना आवर्जून उपस्थित राहत. मात्र पुणे महापालिका निवडणुकांच्या वेळी कोल्हेंची जादू फारशी न चालल्याचं चित्र आहे.
अमोल कोल्हे यांनी 2015 पासून शिवसेनेच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागाचं संपर्कप्रमुख पद सांभाळलं होतं. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत शिवसेनेची झालेली पिछेहाट पाहून या पराभवाची नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती.
'आदरणीय उद्धवसाहेब, आपण माझ्यावर विश्वास दाखवून फार मोठी जबाबदारी सोपवली होती. वेळोवेळी आपण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभेही राहिलात. परंतु आपला विश्वास सार्थ ठरवण्यात मी अपयशी ठरलो. इतर कोणालाही दोष न देता मी या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो' असं पत्र फेब्रुवारी 2017 मध्ये कोल्हेंनी लिहिलं होतं.
डॉ. अमोल कोल्हे यांनी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. मात्र स्टार प्रवाह वाहिनीवरील राजा शिवछत्रपती मालिकेतील शिवरायांच्या भूमिकेमुळे ते नावारुपाला आले. कलर्स वाहिनीवर वीर शिवाजी ही त्यांची हिंदी मालिकाही गाजली होती.