मुजोर पोलिसांची तक्रार करणाऱ्या हिंगोलीच्या पोलीस उपअधीक्षक सुजाता पाटील यांना मुंबईतील डी एन नगर पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबल आणि पोलीस शिपायांनी हे उत्तर दिलं.
रिक्षाचालकांची मुजोरी आणि पोलिसांच्या उर्मटपणाचा फटका बसलेल्या सुजाता पाटील यांनी फेसबुकद्वारे आपली व्यथा मांडली. त्याबाबत एबीपी माझाने त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.
मुंबई पोलीस आणि रिक्षाचालकांची मुजोरी, हिंगोलीच्या डीवायएसपींची फेसबुक पोस्ट
सुजाता पाटील यांनी अंधेरी पश्चिमेला रिक्षाचालकाला भाड्यासाठी विनंती केली, मात्र त्याने भाडे नाकारलं. त्याची तक्रार उपस्थित पोलिसांना केली, पण पोलिसांनी सुजाता पाटील यांनाच अपमानास्पद वागणूक दिली. मग त्यांनी डी एन नगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिसांना तक्रार केली, मात्र त्यांच्याकडूही प्रतिसाद मिळाला नाही.
सुजाता पाटील भोपाळवरुन रेल्वेनं मुंबईत आल्या होत्या. त्यांचा पाय फ्रॅक्चर होता. मुलगी आजारी. सोबत दोन बॅगा होत्या. अशा परिस्थितीत रिक्षाचालकांनी मुजोरी केलीच, पण पोलिसांनीही अपमानास्पद वागणूक दिल्याने, सुजाता पाटील यांनी फेसबुकवर व्यथा मांडली. त्यानंतर त्यांनी एबीपी माझाकडेही सविस्तर प्रतिक्रिया दिली.
सुजाता पाटील काय म्हणाल्या?
मी भोपाळवरुन ट्रेनिंग आटोपून पंजाब मेलने मुंबईत आले. त्यावेळी मला घरातून फोन आला की माझ्या मुलीला भरपूर ताप आहे. तेव्हा मी दादरला होते, तिथून मी लोकल ट्रेनने अंधेरीला आले. अंधेरी पश्चिमेला तीन-चार रिक्षाचालकांना विनंती केली, पण त्यांनी थेट डी एन नगरला येणार नाही असं सांगितलं. रिक्षाचालक एकमेकांकडे पाहून उर्मटपणे माझ्याशी बोलत होते, हसत होते.
हा प्रकार पाहून मी उपस्थित पोलिसांना, लांबूनच इशारा करुन माझ्या पायाला दुखापत झाल्याचं सांगितलं. तसंच इकडे येऊन, मला रिक्षा बघून देण्याची विनंती केली.
त्यावेळी पोलिसांनी आम्ही येणार नाही, तू इकडे ये, असं सांगितलं. मग मी फ्रॅक्चर पायाने लंगडत, बॅगा ओढत पोलिसांकडे गेले. त्यावेळी ट्रॅफिक पोलीस माझ्याकडे पाहून, हसत निघून गेले.
तरीही मी पोलिसांकडे जाऊन, रिक्षावाल्यांची तक्रार केली. मी 18 तास प्रवास करुन आल्याचं, पाय फ्रॅक्चर असल्याचं सांगितलं. तसंच तुम्ही माझ्या मदतीला आला नाहीत, मी प्रवासी आहे असं सांगितलं. तर पोलीस म्हणाले, मी तुमचा नोकर आहे का? तुम्ही मला रिक्षा स्टॅण्डला कशाला बोलवता?
त्यावर मी त्यांना सांगितलं की मला तुमची मदत हवी होती, तर त्यानंतर पोलिसाने माझा अपमान करण्यास सुरुवात केली.
मग मी त्यांना नाव विचारलं. तर त्या पोलिसाने नेमप्लेट काढून खिशात ठेवली आणि तू माझं काय वाकडं करणार आहेस असं उर्मटपणे बोलला.
त्यानंतर शिर्के नावाचे शिपाई बाहेर आले, ते म्हणाले जास्त हुशारी करु नकोस. तुला नाव कशाला पाहिजे, नंबर कशाला पाहिजे. हिचं नाव घे, डायरीत नाव लिहून घ्या, हिची आयडेंडिटी घ्या, तुला काय वाटतं आम्ही तुला घाबरतो का?
पोलिसांचं हे वर्तन पाहून मी अतिशय हतबल झाले होते. मी काहीही करु शकत नव्हते.
त्यानंतर त्यांनी मला बाजूला हाकललं. मी काहीही बोलत नव्हते. दुसऱ्या एका रिक्षावाल्याला मी विनंती केली, कितीही पैसे घे पण डी एन नगरला चल अशी याचना केली. माझे अश्रू ढळत होते, अंगाला घाम फुटला होता.
त्या रिक्षावाल्याने मला पैसे नको, मी तुम्हाला हवं तिथं सोडतं असं सांगितलं.
मग मी 100 नंबरला कॉल केला, माझी ओळख सांगितली, पण तिकडूनही मला प्रतिसाद मिळाला नाही.
त्यानंतर मी डी एन नगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना फोन केला, त्यांनी तीन-चार वेळा फोनच उचलला नाही. ज्यावेळी फोन उचलला त्यावेळी मी त्यांना डीवायएसपी बोलते सांगितलं. पण तरीही त्यांनी मिटींगमध्ये असल्याचं सांगून, कॉल कट केला.
हा सर्व अपमान मला सहन झाला नाही. हे कुठेतरी थांबायला हवं, या हेतूने मी भावना अनावर झाल्याने फेसबुक पोस्ट लिहिली.
माझं पोलीस दल आदर्शवत व्हावं, ही माझी इच्छा आहे. या दोन पोलिसांना शिक्षा झालीच पाहिजे.
जनतेशी कसं वागावं, हे वरिष्ठांनी शिकवावं
माझ्यासारखा अनुभव अनेकांना येतो. त्यामुळे वरिष्ठ पोलिसांनी कनिष्ठ पोलिसांना जनतेशी कसं वागावं हे शिकवावं, असं सुजाता पाटील म्हणाल्या.
नोकरी पणाला लावून फेसबूक पोस्ट
पोलीस दलातील अशा कृती थांबायला हव्या या हेतूने मी फेसबुक पोस्ट टाकली आहे. मी नोकरी पणाला लावून फेसबुक पोस्ट लिहिली, सरकारने मला काहीही शिक्षा दिली, फाशी दिली तरी मी तयार आहे, असं सुजाता पाटील म्हणाल्या.
काय आहे नेमकं प्रकरण?
पोलीस आणि रिक्षाचालकांच्या मुजोरीचा अनुभव सामान्यांना नवा नाही. पण एका महिला डीवायएसपीलाही त्यांच्या छळाचा, मनस्तापाचा सामना करावा लागला.
ही गोष्ट आहे 24 मार्च म्हणजे शनिवारची. आणि त्या अधिकारी होत्या डीवायएसपी सुजाता पाटील.
शनिवारी सकाळी 10 वाजता सुजाता पाटील भोपाळवरुन रेल्वेनं मुंबईत आल्या. त्यांचा पाय फ्रॅक्चर होता. मुलगी आजारी. सोबत दोन बॅगा. अंधेरी पश्चिम स्थानकाबाहेर त्यांनी रिक्षावाल्याला इप्सित स्थळी जाण्याची विनंती केली. पण नेहमीप्रमाणे त्यांनी भाडं नाकारलं. हा सगळा प्रकार 100 फूटावर असलेला पोलीस शिपाई निवांत बघत होता.
शेवटी त्यांनी मदत मागण्यासाठी डी.एन.नगर पोलीस ठाणं गाठलं. पण स्वत:ची ओळख सांगितली नाही. तिथं त्यांना मदतीऐवजी अपमानास्पद वागणूक मिळाली. अखेर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, पण मदत मिळाली. तशाच अवस्थेत सुजाता पाटील तिथून निघून गेल्या. आणि त्यांनी हा सगळा प्रसंग फेसबुक पोस्ट लिहून कथन केला.
त्यामुळे महिला सुरक्षा आणि त्यांना मदत वगैरे निव्वळ गावगप्पा असल्याचं समोर आलंय. दरम्यान या प्रकारानंतर आता मुंबई पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिलेत.
VIDEO:
संबंधित बातमी
मुंबई पोलीस आणि रिक्षाचालकांची मुजोरी, हिंगोलीच्या डीवायएसपींची फेसबुक पोस्ट