पुणे: सध्या कौटुंबिक हिंसाचार आणि त्यामुळे होणारे घटस्फोट यांचं प्रमाण खूपच वाढलं आहे. त्यामगची कारणंही वेगवेगळी आहेत. पुण्यात घटस्फोटासाठी चपातीचा आकार हे एक प्रमुख कारणांपैकी एक कारण ठरलं आहे.
एका आयटी इंजिनिअरने चपातीच्या आकारावरुन कौटुंबिक हिंसाचार केल्याचा दावा, पत्नीने केला आहे. त्यामुळे पतीची मारहाण, क्रूरता याला कंटाळून पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.
तसंच पत्नीने पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा दावाही दाखल केला आहे.
दहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2008 मध्ये दोघांचं लग्न झालं. मात्र आयटी क्षेत्रात असलेला पती अती काटेकोर असल्याचं पत्नीचं म्हणणं आहे.
दिवसभरात काय काय केलं, ते एक्सेल शीटमध्ये वेगवेगळ्या रंगात करण्यास सांगत असे. जर ते केलं नसेल, तर त्याचं कारण लिहिण्यासाठी एक कॉलम असे. तो ही भरला नाही तर शिवीगाळ, घालून पाडून बोलणं आणि मारहाण होत असे, असं पत्नीचं म्हणणं आहे.
इतकंच नाही तर चपातीचा आकार विशिष्टच असला पाहिजे. चपाती 20 सेमीचीच व्हायला हवी. त्या आकाराची चपाती झालीय की नाही हे तो मोजत असे, असाही दावा तिने केला आहे.
याशिवाय क्रूरतेची हद्द म्हणजे थंड पाणी अंगावर ओतून, एसी असलेल्या खोलीत मला कोंडत असे, असाही दावा पत्नीने केला आहे. तसंच त्याने मला अनेकवेळा आत्महत्या करण्यासाठी दबाव आणला, मात्र कारण आम्हाला एक मुलगी असल्याने मी ते पाऊल उचललं नाही, असंही पत्नीने म्हटलं आहे.
दरम्यान, याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास पतीने नकार दिला.